नागपुरात अडकलेल्या उत्तरप्रदेशच्या यात्रेकरुंना शहरातील तरुणांनी दिला मदतीचा हाथ
कोरोना वायरसमुळे देशभरात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागतोय. रेल्वे विभागाने 31 मार्चपर्यंत वाहतूक सेवा बंद केल्याने प्रवाशांपुढे मोठी अडचण उभी ठाकली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्जापूर येथील 28 वयोवृद्ध नागपुरात अडकले होते. दक्षिणेतील रामेश्वरची यात्रा आटोपून ते मदुरई निजामुद्दीन एक्सप्रेसने शनिवारी मध्यरात्री नागपुरात पोहोचले.
सोमवारी सकाळी उत्तरेकडे जाणा-या एर्नाकुलम एक्सप्रेसने ते मिर्जापूरला जाणार होते, मात्र गाडीत प्रचंड गर्दी असल्याने ते गाडीत चढू शकले नाही. यांच्यातील 52 तरुणांनी मात्र गाडीत प्रवेश मिळवला. उरलेले 28 जण वयोवृद्ध असल्याने त्यांना गाडीत चढणे शक्य झाले नाही. अखेर नाईलाजास्तव त्यांनी रेल्वे स्थानकावर ठाण मांडले. मात्र सुरवातीला रेल्वे प्रशासनाने त्यांना स्थानकातून हुसकावून लावले.
भूक व तहानेने व्याकूळ झालेल्या या वृद्धांनी स्थानकाबाहेर अनेकांना मदतीचा आर्जव केला. अखेर रेल्वे स्थानकावर बातमी संकलित करण्यासाठी गेलेल्या काही पत्रकारांनी त्यांची व्यथा सोशल मिडीयावरुन मांडली. सोशल मिडीयावर याबाबतची माहिती वायरल होताच नागपुरातील अनेक सामाजीक संस्था व कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनकडे धाव घेतली.
अखेर रेल्वे प्रशासनाने देखील परिस्थितीचे गांभिर्य ओळखून त्या वृद्ध मंडळींना मदत व मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समिती नागपूरचे अभिषेक मिश्रा व रितेश पांडे यांनी त्यांच्या चहा नाश्ता व भोजनाची व्यवस्था केली. याशिवाय नविन मिश्रा, अनुप पाटील, रितेश पिल्लेवार यांसारख्या युवकांनी ट्रव्हल्स एजन्सीशी बोलून 3 तवेरा गाड्यांची व्यवस्था करत त्यांना मिर्जापुरकडे रवाना केले.
काही मंडळींनी या समुहाला गाड्यांच्या प्रवासासाठी आर्थिक मदत केली आहे. त्यांचा प्रवास बिनदिक्कत व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने त्यांना पत्रही दिले आहे. दरम्यान रेल्वे स्थानकावर हजर असलेल्या कोरोना हेल्प डेस्कने सर्व वृद्धांची आरोग्य तपासणी करुन त्यांना प्रमाणपत्रही दिले आहे.