मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन : मास्क वापरणे आता बंधनकारक
नागपूर: कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वत:चे योद्धा बना. स्वत:ला त्रास करवून घेऊ नका. इतरांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क वापरा. सामाजिक अंतर पाळा. घरात प्रवेश करताना हात स्वच्छ धुवा. प्रत्येकाने कोरोनाविरुद्धची लढाई स्वत: योद्धा बनून लढायची आहे, असे भावनिक आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
मास्क वापरणे आता बंधनकारक
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी (ता. ८) एक आदेश काढून घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आता बंधनकारक केले आहे. या आदेशानुसार शहरातील रस्ते, रुग्णालये, कार्यालये, बाजार इत्यादी सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही हेतूने वावरणाऱ्या व्यक्तीने, खासगी किंवा कार्यालयीन वाहनाने कुठेही वावरताना तसेच कार्यालय अथवा कामांच्या ठिकाणावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. कोणत्याही व्यक्ती, अधिकाऱ्यांनी मास्क परिधान केल्याशिवाय सभा, बैठकीला उपस्थित राहू नये. प्रमाणित मास्क औषधींच्या दुकानात उपलब्ध असून ते वापरता येतील किंवा घरी बनविलेले मास्कसुद्धा वापरता येतील. व्यवस्थित धुवून आणि निर्जंतुकीकरण केलेले मास्कदेखिल वापरता येतील, असे आदेशात नमूद केले आहे. या आदेशाचे पालन न झाल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये नागरिक कारवाईस पात्र ठरतील, असेही आदेशात म्हटले आहे. मास्क घरच्या घरी देखील सुती कापडापासून तयार करता येईल. घरच्या घरी मास्क तयार करण्याची कृती ‘मास्क इंडिया डॉट कॉम’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.
नागपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रसार रोखणे, हे केवळ नागरिकांच्या हाती आहे, असे सांगताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना शासनाने दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. समाजाने एकत्रित येऊन ही लढाई लढणे गरजेचे आहे. प्रत्येकाने योद्धा बनणे गरजेचे आहे. योद्धा बनणे म्हणजे लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करणे होय. अत्यंत आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे. घराबाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक आहे. आवश्यक कामाने घराबाहेर पडलाच तर लवकरात लवकर घरात यावे. घरात प्रवेश करताना साबणाने हात स्वच्छ धुवावे. हे करणे म्हणजेच योद्धा होय. हे केलं नाही म्हणजे समाजाचे शत्रू बनणे होय. त्यामुळे समाजाचा शत्रू न बनता स्वत:चा आणि समाजाचा योद्धा बना, असे आवाहन त्यांनी समस्त नागपूरकरांना केले आहे.