‘महापौर चषक’ अखिल भारतीय खो-खो स्पर्धा ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान
नागपूर महानगरपालिकेतर्फे ६ ते ९ फेब्रुवारी रोजी ‘महापौर चषक’ अखिल भारतीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेमध्ये देशाच्या विविध राज्यांमधून महिला व पुरुष खेळाडू सहभागी होतील. सहभागी खेळाडूंच्या निवास व भोजनाची व्यवस्था मनपातर्फे करण्यात येणार आहे. यासंबंधी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले यांनी दिले.
विविध विषयांच्या अनुषंगाने मंगळवारी (ता. ४) क्रीडा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. क्रीडा समिती सभापती कक्षात आयोजित बैठकीत समिती सभापती प्रमोद चिखले यांच्यासह समितीच्या उपसभापती उपमहापौर मनीषा कोठे, सदस्य रमेश पुणेकर, सदस्या वंदना चांदेकर, कांता रारोकर, उपयुक्त राजेश मोहीते, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, जितेंद्र गायकवाड आदी उपस्तिती होते.
बैठकीत ६ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत ‘महापौर चषक’ अखिल भारतीय खो-खो स्पर्धा तसेच २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत आयोजित दिव्यांग ‘महापौर चषक’ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन २२ फेब्रुवारी रोजी आयोजित राज्यस्तरीय सुराज्य दौड स्पर्धा आदींच्या आयोजनाच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात आली.
महाल येथील ‘रा. पै . समर्थ स्टेडियम’ (चिटणीस पार्क) येथे ६ ते ९ फेब्रुवारी रोजी ‘महापौर चषक’ अखिल भारतीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील मुलींचे १२ व मुलांचे १६ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी खेळाडू तसेच प्रशिक्षक, व्यवस्थापक यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था मनपा तर्फे करण्यात येणार आहे. ६ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता स्पर्धेचे उद्धघाटन होईल तर ९ फेब्रुवारीला सायंकाळी ८ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल, यासंबंधी आवश्यक तयारी करण्याचे निर्देश क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले यांनी दिले.