लॉन, मंगल कार्यालये ३१ मार्च पर्यंत बंद ठेवा
शहरात ‘कोरोना व्हायरस’चा प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील सर्व लॉन, मंगल कार्यालयेही ३१मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
नागपूर शहरात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा व शहर प्रशासनातर्फे सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये, शॉपिंग मॉल, सिनेमागृह, जिम आदी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश नुकतेच राज्य शासनाने दिले. त्यानुसार मनपा हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये, शॉपिंग मॉल, सिनेमागृह, जिम आदी बंद ठेवण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. मात्र किराणा दुकान, औषधालय, दूध, भाजीपाला व अन्य आवश्यक सेवा सुरू ठेवाव्यात असेही त्यांनी म्हटले आहे.
शहरातील सर्व धार्मिक तथा सार्वजनिक कार्यक्रमही तूर्तास स्थगित करण्यात यावे, सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील सर्व लॉन तसेच मंगल कार्यालयातील कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहनही मनपा आयुक्तांनी केले आहे.
मनपा हद्दीबाहेरील महाविद्यालयही बंद करण्याचे आवाहन:- मनपा हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मनपाच्या हद्दीबाहेरीलही अभियांत्रिकी आणि इतर महाविद्यालयात बाहेरगावचे विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे या महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. शहरातील सर्व ट्यूशन क्लासेसही ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.