सतरंजीपूरा झोनमधील बडी मज्जीद परिसरातील सीमा सिल
नागपूर शहरातील सतरंजीपूरा झोनमधील बडी मज्जीद परिसरातील रहिवासी नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासंबंधी खबरदारी म्हणून सतरंजीपूरा भागाच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपा आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण भाग सिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी (ता.६) सतरंजीपूरा झोनमधील बडी मज्जीद परिसरातील एका ६८ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाल्याने खळबळ माजली. यासंबंधी खबरदारी म्हणून मनपा आयुक्तांनी तात्काळ सतरंजीपूरा झोनमधील बडी मज्जीद परिसरातील सर्व सीमा बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बडी मस्जीद, सतरंजीपूरा प्रभाग २१ या भागातील निश्चित केलेल्या कंटेनमेंट एरीया उत्तर-पूर्वेस शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, दक्षिण-पूर्वेस रचना कॉम्प्लेक्स, दक्षिण-पश्चिमेस जुना मोटार स्टँड चौक, उत्तर-पश्चिमेस मारवाडी चौक टी-पॉईंट हा सर्व भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
अत्यावश्यक सेवा देणारे जसे, शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी आणि कर्मचारी, आवश्यक तातडीची सेवा करणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टोअर्स् दुकानदार, पॅथॉलॉजीस्ट, रुग्णवाहिका इत्यादी तसेच पोलिस विभागातर्फे पास धारक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-या व्यक्ती आदी सर्व वगळता इतर नागरिकांना बाहेर येण्या-जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आले आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःसह कुटुंबीयांची काळजी घ्यावी. कुणीही अनुज्ञेय कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. नियमीत स्वच्छता राखावी. आवश्यक मदतीसाठी मनपाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.