सोमवार आठवडी बाजारावर कारवाई करा
काशीनगर रहिवासी कृती समितीचे महापौरांना निवेदन
नागपूर. दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या रामेश्वरी, काशिनगर येथील सम्राट अशोक कॉलोनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अनाधिकृत सोमवारी साप्ताहिक बाजार सुरू आहे. अनाधिकृत बाजाराला बंद करून समस्येचे निराकारण करणे, प्रभाग क्रमांक -33 मधील मनपा प्रशासनाच्या मोकळ्या भूखंडावर बगिचा, क्रीडा संकूल, समाजभवन, वाचनालय तयार करण्यात यावे, दर सोमवारला बाजार बंद करण्यासाठी मनपा प्रशासनाद्वारे काशीनगर, द्वारकापुरी, रामेश्वरी रोड परिसरात अतिक्रमण करावाई करावी, तसेच बाजारातील दुकानादारांना दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून त्यांचे पूनवर्सन करावे आदी मागणीचे निवेदन सम्राट अशोक कॉलोनी, काशीनगर रहिवासी कृती समितीच्या मार्फत रहिवासीयांनी महौपार संदीप जोशी यांना दिले. शिष्टमंडळामध्ये अनिता कांबळे, सुनिता मगरे, भूपेंद्र (गोलू) बोरकर, डॉ. मधूकर मून, भीमराव मगरे, भूषण भस्मे, शिरीष जंगले, ज्योती झोडापे, रजनी पाटील, सचिन बोईनवार, सचिन श्रीवास, रोशन शेंडे, सोनू उपासक, रवि रामटेके, अमित उपासक, अर्जुन चव्हाण, राहुल येन्नावार आदिंची उपस्थिती होती. यावेळी नागरिकांनी महापौर जोशी यांना सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून काशिनगर येथील सम्राट अशोक कॉलोनी परिसरात दर सोमवारला अनअधिकृत साप्ताहिक बाजार भरत आहे. याबाबत अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक महापौर, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, झोनल अधिकारी, आरोग्य अधिकारी, अजनी पोलिस निरीक्षकांना वारंवार निवेदन आणि तक्रार करूनही निराकरण करण्यात आले नाही. या भागात आठवडी बाजाराने केलेल्या अतिक्रमणामुळे येथील जनतेचे आरोग्यासह गुन्हेगारी घटनांमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. नागपूर महानगर पालिकेची मोकळी जागा या ठिकाणी बाजार बसविण्याचा घाट या सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. परंतु, दाट वस्तीसह रस्त्यांची समस्या असलेल्या या पट्टयात बाजाराऐवजी बगिचा, वाचनालय, क्रीडा संकूल, समाज भवन, खेळाचे मैदान आदि वास्तूंची गरज आहे. त्या मोकळया भूखंडावर मनपाने या सुविधा निर्माण केल्यास तर स्थानिक नागरिकांना दुसऱ्या प्रभागात सुविधा घेण्यास जावे लागणार नाही. तसेच सदर बाजारातील दुकानदारांना दुसऱ्या जागी स्थानांतरीत करून त्यांचे पूनवर्सन करावे, दर सोमवारला बाजार बंद करण्यासाठी मनपा प्रशासनाद्वारे काशीनगर, द्वारकापुरी, रामेश्वरी रोड परिसरात अतिक्रमण करावाई करावी अशी विनंतीही रहिवासीयांनी महापौरांना केली. यावर महापौर संदीप जोशी यांनी रहिवासीयांच्या समस्येला जाणून घेत लवकरच या समस्येचे निराकारण करण्याचे आश्वासन दिले.