१० ‘फिवर क्लिनिक’ सुरू मनपा आयुक्तांचा पुढाकार,नि:शुल्क तपासणी
नागपूर: वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी, खोकल्याने अनेक जण त्रस्त आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी लक्षणे दिसल्याने आधीच धडकी भरते. अशा किरकोळ स्वरूपाच्या आजारांच्या तपासणीकरीता व त्यावरील उपचाराकरीता मनपातर्फे प्रत्येक झोनमध्ये एक याप्रमाणे संपूर्ण शहरात १० ‘फिवर क्लिनिक’ सुरू केले आहेत. संबंधित झोनमधील मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे ‘फिवर क्लिनिक’ सुरू झाले आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, धरमपेठ झोनमधील के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हनुमान नगर झोनमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, धंतोली झोनमधील नरसाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नेहरूनगर झोनमधील नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीबाग झोनमधील मोमीनपूरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सतरंजीपुरा झोनमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, लकडगंज झोनमधील पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आसीनगर झोनमधील कपील नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगळवारी झोनमधील इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ‘फिवर क्लिनिक’ नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहेत.
वातावरणातील बदल आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यामुळे अनेकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. या गोष्टीची दखल घेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे दहाही झोनमध्ये १० ‘फिवर क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. या ‘फिवर क्लिनिक’ मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे नि:शुल्क तपासणी व उपचार केले जाणार आहे.
याव्यतिरिक्त ज्या नागरिकांना खासगी रुग्णालयामध्ये तपासणी करायची असेल त्यांना मनपाद्वारे नोंदणीकृत खासगी रुग्णालय व हॉस्पिटलमध्ये जाउन तपासणी करता येईल. यासंबंधी मनपाद्वारे सर्व खासगी रुग्णालय तथा हॉस्पिटलना सेवा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.
‘फिवर क्लिनिक’ सुरू करण्यात आलेले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
अ.क्र. | झोन | नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र |
१ | लक्ष्मीनगर | जयताळा |
२ | धरमपेठ | के.टी. नगर |
३ | हनुमाननगर | नरसाळा |
४ | धंतोली | बाबुलखेडा |
५ | नेहरूनगर | नंदनवन |
६ | गांधीबाग | मोमीनपूरा |
७ | सतरंजीपुरा | जागनाथ बुधवारी |
८ | लकडगंज | पारडी |
९ | आसीनगर | कपील नगर |
१० | मंगळवारी | इंदोरा |
या ‘फिवर क्लिनिक’मध्ये एक एमबीबीएस डॉक्टर, एक परिचारिका, फॉर्मसिस्ट, पॅथॉलॉजिस्ट सेवा देतील. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेमध्ये नागरिकांना नि:शुल्क सेवा देण्यात येईल. ‘फिवर क्लिनिक’मध्ये रुग्णावर आवश्यक उपचार केले जाईल. आवश्यकता असल्यास त्याच्या रक्ताचे नमूने घेतले जातील, आवश्यक औषधेही देण्यात येतील. याशिवाय तिव्र स्वरूपाचे ताप व अन्य लक्षणे दिसून आल्यास तातडीने त्याला पुढील तपासणीकरीता पाठविण्यात येईल.