१४ हजार नागपूरकरांपर्यंत पोहोचले शिवभोजन
दिवसाला १५० थाळ्यांचे वितरण
नागपूर:- राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या शिवभोजन थाळीचा लाभ नागपुरातील १४ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी घेतला आहे. नागपुरात आता दहा केंद्र सुरू असून दिवसाला ७५० थाळ्यांचे वितरण करण्यात येत आहे.
२६ जानेवारीपासून राज्यात शिवभोजन थाळीला सुरुवात झाली. नागपुरात सुरुवातीला नऊ केंद्रांवरून शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचे नियोजन होते. डागा रुग्णालयात केंद्राला जागाच मिळाली नसल्याने रुग्णालयाच्या परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले. त्यामुळे नागपुरात एकूण दहा केंद्र सुरू असून प्रत्येक केंद्रावरून ७५ थाळी अशा १० केंद्रांवरून ७५० थाळ्यांचे वितरण करण्यात येत आहे.
प्रत्येक नागरिकाला १० रुपयांत ४१० ग्रॅमचे भोजन मिळावे, असा नियम असून प्रशासनाकडून थाळीवर वॉच ठेवण्यात येत आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत ९ हजार १३ थाळ्यांचे वितरण करण्यात आले. ५० रुपयांची थाळी नागरिकांना १० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येत आहे. केंद्रचालकांना उर्वरित पैसा शासनाकडून प्राप्त होत आहे. नागपुरातील दहा केंद्रचालकांच्या खात्यात अनुदानाचे ९ हजार १३ रुपये खासनाने जमा केले आहेत. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला थाळीनुसार केंद्रचालकांना त्याचे अनुदान मिळणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत १४ हजार २६३ थाळ्यांचे वितरण करण्यात आले.
राज्यात दरदिवशीच्या थाळ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. पहिल्या दिवशीची ११,३०० थाळ्यांची संख्या आता १४,६३९वर पोहोचली आहे. या योजनेत राज्यात १३९ शिवभोजन केंद्र सुरू झाली आहेत.
१७ दिवसांच्या काळात राज्यात २ लाख ३३ हजार ७३८ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. नागपूर जिल्ह्यासाठी दिवसाला ७५० थाळ्या वितरित करण्यात येत असून, गुणवत्तेचे निकष पूर्ण करणाऱ्या केंद्रांची यासाठी निवड करण्यात आली आहे.
नागपुरात दहा केंद्रांवरून वितरण
ठिकाण : केंद्राची संख्या : दिवसाला थाळी
डागा हॉस्पिटल : २ : १५०
गणेशपेठ बसस्थानक : २ : १५०
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल : २ : १५०
कळमना मार्केट : २ : १५०
मातृसेवा संघाजवळ, महाल : २ : १५०
अशी आहे शिवभोजन थाळी
मेनू : परिमाण : दर
चपाती : २ (प्रत्येकी ३० ग्रॅम) : १० रुपये
भाजी : १ वाटी (१०० ग्रॅम) : २० रुपये
वरण : १ वाटी (१०० ग्रॅम) : १० रुपये
भात : १५० ग्रॅम : १० : रुपये