आता मनपामध्ये हात धुतल्यानंतरच प्रवेश
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार प्रशासकीय इमारतीपुढे व्यवस्था
‘कोरोना’वर मात करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आता नागपूर महानगरपालिकेमध्ये हात धुतल्यानंतरच प्रवेश करता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीपुढे हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.२४) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतः प्रवेशद्वारावर हात धुवूनच कार्यालयात प्रवेश केला.
स्वच्छता हाच ‘कोरोना’पासून बचावाचा उत्तम उपाय आहे. प्रत्येकाने कोणत्याही व्यक्ती अथवा वस्तूंच्या संपर्कात आल्यास हात धुणे अत्यावश्यक आहे. मनपामध्ये येणा-या अधिकारी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांनाही सवय लागावी या हेतूने प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे हॅण्डवॉश किंवा साबणाने हात स्वच्छ धुवूनच कार्यालयात प्रवेश करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.