आरटी-पीसीआर चाचणीविना जिल्ह्यात प्रवेशबंदी : जिल्हाधिका-यांनी जारी केला आदेश
नागपूर: कोरोनाचा दुबार वाढता कहर लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आता इतर राज्यातून येणा-या नागरिकांना आरटी-पीसीआर चाचणीशिवाय प्रवेशाची परवानगी न देण्याचे आदेश जारी केले आहेत. हवाई, रेल्वे आणि रस्ते मार्गाने इतर राज्यातून येणा-या नागरिकांना आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. ठाकरे म्हणाले की, नागपूरसह देशभरात कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता बाह्य राज्यांतून येणार्या लोकांची आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. 25 नोव्हेंबरपासून सर्व संबंधित यंत्रणेला हा आदेश लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अहवाल निगेटिव असणे आवश्यक: जिल्हाधिकारी म्हणाले की नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग व शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांनाही या संदर्भात माहिती दिली आहे. प्रामुख्याने दिल्ली, एनसीआर, राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यामधून येणा-या प्रवाशांना कोरोनाचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल असणे आवश्यक आहे, तरच त्यांना प्रवेश देण्यात येईल. जिल्हास्तरावर आरोग्य विभाग, पोलिस विभाग आणि महसूल विभागाच्या अधिका-यांची टीम तयार केली आहे. नागपूर जिल्ह्यातील रेल्वे मार्गावरून काटोल आणि नरखेड दिशेने येणार्या प्रवाशांची यादी मिळाल्यानंतर ही टीम आरटी-पीसीआर अहवाल तपासेल.
सीमेवर तपासणी यंत्रणा: त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सावनेर, नरखेड, रामटेक मार्गे नागपूर जिल्ह्यात दाखल होणा-या नागरिकांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्ट तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. कोरोना संसर्गाची वाढती संख्या पाहता नागरिकांनी मास्क घालावे, सुरक्षित अंतर ठेवावे, साबणाने वारंवार हात धुवावेत, सॅनिटाईजेशन करने आणि गरज नसतांना घराबाहेर पडू नये असे त्यांनी आवाहन केले आहे. कोरोना लस येईपर्यंत नागरिकांना वरील उपायांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे ठाकरे म्हणाले आहेत.