‘कोरोना’ रुग्णांच्या सेवेसाठी पुढाकार घ्या!
‘कोरोना’वर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन यांच्यासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. या आरोग्य यंत्रणेच्या साथीला वैद्यकीय क्षेत्रातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यानी यावे, असे आवाहन नागपूर महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
‘कोरोना’शी लढा देण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा दिवसरात्र काम करीत आहे. काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. तरीही भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवली तर आरोग्य यंत्रणाही तोकडी पडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता यापूर्वी निमलष्करी दल, सैनिकी सेवा, शासकीय आरोग्य सेवा, मनपा आरोग्य सेवा आदी ठिकाणी सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, डीएमएलटी असलेले व्यक्ती आदिंनी स्वतः पुढाकार घेऊन कोरोनाशी एकत्रितपणे लढा देण्यासाठी आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जे व्यक्ती ही सेवा देण्यास इच्छुक आहेत, त्यांनी मनपाचे सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांचेशी ९८२२५६९२१३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे मनपाद्वारे कळविण्यात आले आहे.