खबरदारी तुमची, जबाबदारी आमची…! मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे भावनिक आवाहन
नागपूर शहरामध्ये कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. रुग्णांची संख्या वाढतेच आहे. किमान आतातरी लॉकडाऊनदरम्यान घराच्या बाहेर पडू नका. नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन जनतेची काळजी घेते आहे. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, या शब्दात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भावनिक आवाहन करीत लोकांना सहकार्य करण्यासाठी साद दिली.
रविवारी (ता.१२) शहरात १४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून नागरिकांना गांभीर्य सांगितले आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले.
रविवारी आढळलल्या १४ रुग्णांमध्ये चार जबलपूरचे, एक कामठी येथील आणि उर्वरित ९ नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्ण आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने आपणा सर्वांना आता आणखी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
यासंबंधी माहिती देताना मनपा आयुक्तांनी सांगितले की, सर्व १४ ही रुग्णांना यापूर्वीच ‘क्वारंटाईन’ करण्यात आले होते. त्यांची चाचणी घेतल्यानंतर रविवारी ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी पूर्वीच क्वारंटाईन केल्यामुळे त्यांच्यापासून इतरत्र कोरोना पसरण्याची भीती नाही. दिल्ली येथून प्राप्त माहितीच्या आधारे २५१ व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात आलले ३० अशा एकूण २८१ व्यक्तींना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले होते. दिल्ली येथून आलेल्यांमध्ये ८ जण मूळचे जबलपूरचे आहेत. या आठ जणांपैकी चौघे कोरोनाग्रस्त असल्याने निष्पन्न झाले आहे.
कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला परिसर खबरदारीच्या दृष्टीने सील करण्यात येतो. त्यानुसार सदर रुग्ण राहत असलेला सतरंजीपुरा, मोमीनपुरा परिसर पूर्णतः सील करण्यात आला आहे. तर काही रुग्ण काटोल रोड व कामठी रोड भागातील असून तो परिसरही सील करण्यात येत आहे. संसर्ग पसरू नये यासाठी मनपातर्फे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी मनपाने टीम निर्धारित केल्या असून १४ दिवस मनपाची चमू निर्धारित परिसर, तेथील घरे आणि लोकसंख्या या सर्वांची माहिती घेऊन सर्वेक्षण करणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी सर्वेक्षण करणा-या चमूला व मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
दक्ष राहा, लक्षणे आढळल्यास त्वरित मनपाला माहिती द्या
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची वाढती संख्या ही नागपूरकरांसाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला अधिक जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या ३० लाख लोकांचे आरोग्य आपल्याच हातात आहे. त्यामुळे या ३० लाख लोकांनाच आता ठरवायचे आहे की कोरोनाशी लढा कसा द्यायचा. संक्रमण वाढत आहे, दक्ष राहा. अशा स्थितीत घराबाहेर न पडणे जास्त संयुक्तिक आहे. जीवनावश्यक वस्तू शक्यतो फोनवरूनच घरी मागवा. बाहेर जाण्याची गरज पडल्यास मास्क वापरा, सोशल डिस्टंनसिंगचे पालन करा. कुणाच्या संपर्कात आल्यास, ताप, सर्दी, कोरडा खोकला येत असेल तर त्वरित मनपाच्या नियंत्रण कक्षाला माहिती द्या. वेळेत उपचार झाल्यास कोरोनापासून लवकर बरे होता येईल. त्यामुळे सजग राहा, निमयांचे पालन करा, प्रशासनाला सहकार्य करा, असेही आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.