घरीच राहा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन नागपुरातील परिस्थितीला गांभीर्याने घ्या;
नागपूर: नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून एकाचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी शासनाने दिलेले निर्देश पाळावे. घरात राहावे, सुरक्षित राहावे असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागपूर महानगरपालिका आवश्यक ती सर्व काळजी घेत आहे. कोव्हिड-१९ चे पॉझिटिव्ह असलेले रुग्ण ज्या परिसरात राहतात, त्या परिसरात राहणाऱ्या कुण्या व्यक्तीला जर बाधा झाली असेल तर ते तातडीने समोर यावे, त्यांच्यामुळे इतरांमध्ये हा विषाणू पसरु नये, यासाठी ही काळजी घेत जात असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. याअंतर्गत लक्ष्मीनगर झोनमध्ये १८५ चमू, धंतोली झोनमध्ये दोन चमू, गांधीबाग झोनमध्ये ३५ चमू आणि मंगळवारी झोनमध्ये २३ चमूंच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरु आहे. लक्ष्मीनगर झोनमधील २७४६३ घरांतील १०६७१९ नागरिक, धंतोली झोनमधील ५९ घरातील २७८ नागरिक, गांधीबाग झोनमधील १४९७ घरातील ७७३८ नागरिक आणि मंगळवारी झोनमधील २१४९ घरांतील ९३१४ नागरिकांची या चमूंच्या माध्यमातून दररोज माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे नागपुरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला हे धक्कादायक आहे. त्यामुळे समूह संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. जीवनावश्यक सर्व वस्तू मुबलक आहे. भाजीपाला, किराणा, दुध यासारख्या सेवा घरपोच मिळतील याबाबत व्यवस्था मनपाने काही व्यवसायीक व शेतकरी बचतगटाच्या माध्यमातुन केली आहे. किमान पुढील काही दिवस स्वत:वर बंधन घालणे आवश्यक आहे. यासोबतच वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर हात स्वच्छ करण्यासाठी करावा, बाहेर निघताना मास्क लावावे, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
शहरात १७ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण
याव्यतिरिक्त दहाही झोनमध्ये ३३३ चमूंच्या माध्यमातून संपूर्ण नागरिकांची माहिती घेण्यात येत आहे. एकूण लोकसंख्येपैकी आतापर्यंत १७६१२८५ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एकूण ४३७१९१ घरांचे सर्व्हेक्षण झाले असून दररोज सुमारे २८३९३ घरांचे सर्वेक्षण होत आहे. याव्यतिरिक्त प्रभागनिहाय ‘रॅपिड रिस्पान्स टीम’ तयार करण्यात आली असून आलेल्या माहितीच्या आधारे तातडीने संबंधित ठिकाणी पोहचून नागरिकांची तपासणी केली जाते. संपूर्ण शहरात दहाही झोन मिळून असे ३८ पथक आहे. आतापर्यंत १५३८ घरांना रॅपिड रिस्पान्स टीमने भेट दिली आहे.
८६८ पैकी ७७८ निगेटिव्ह
नागपुरात कोरोनाचे संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. आतापर्यत १२०२ नागरिकांत कोरोनाची लक्षणे आढळली. त्यापैकी १११६ व्यक्ती देखरेखीखाली आहेत. यापैकी ५९५ जणांचा १४ दिवसांचा देखरेखीचा कालावधी पूर्ण झाला आहे. ८६८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी १८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी (ता.७) पॉझिटिव्ह आढळलेला १ रुग्ण चंद्रपुरातील होता. त्यामुळे नागपुरात सद्यस्थितीत १८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आहे. ७७८ नमुने निगेटिव्ह आली असून ७१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. ७८१ व्यक्तींना घरी पाठविण्यात आले असून ८५ व्यक्तींवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.