नागपुरातील उद्यानांची होतेय नव्याने देखभाल दुरुस्ती
नागरिकांना उत्तम आरोग्य लाभावे आणि प्रदुषणरहित प्राणवायू मिळावा यासाठी महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर शहरातील सर्व उद्यानांमधील त्रुट्या दुरुस्त करून यापुढे उत्तमरीत्या देखभाल करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.
नागपूर शहरामध्ये १२६ उद्याने मनपाच्या अख्यत्यारीत असून त्याच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारीही मनपावर आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसोबतच अन्य नागरिकांच्या दृष्टीने शहरातील उद्याने महत्त्वाची आहेत. दररोज हजारो नागरिक सकाळ, संध्याकाळ उद्यानात व्यायामासाठी आणि फिरण्यासाठी येतात. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी या उद्यानांचा उपयोग करण्यात येतो. वाढत्या वाहनसंख्येमुळे मुलांच्या शारीरिक विकासासाठी बगिच्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे.महापौर संदीप जोशी यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुरू केलेल्या ‘वॉक ॲण्ड टॉक’ विथ मेयर या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांनी उद्यानांच्या दुर्दशेकडे त्यांचे लक्ष वेधले होते. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही जनतेच्या आरोग्याला प्राथमिकता देत सर्वप्रथम भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये वैज्ञानिक पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे आणि उद्यानांची दुर्दशा दूर करण्याचे निर्देश दिले होते. महापौर आणि आयुक्तांच्या आदेशानंतर उपायुक्त अमोल चोरपगार (उद्यान) यांनी युद्धस्तरावर उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीला प्रारंभ केला.
सर्वप्रथम बगिच्यातील लॉन व्यवस्थित केले. यानंतर उद्यानातील बालकांसाठी असलेले खेळण्याचे साहित्य, ग्रीन जीम आणि बसण्यासाठी असलेले बाकं सुधरविण्यास प्रारंभ केला. बगिच्यात बंद अवस्थेत असलेल्या कारंजांचीही दुरुस्ती करून ते सुरू केले. मनपातर्फे सुरू करण्यात आलेल्या या प्रयत्नांचे नागरिकांनी स्वागत केले असून सकाळ, संध्याकाळ बगिच्यात येणाऱ्यांची संख्या आता वाढू लागली आहे.
शहरातील प्रत्येक बगिच्याच्या देखरेखीसाठी मनपाने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. या सर्व कंत्राटदारांना बगिच्यांची देखभाल योग्यप्रकारे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात कुचराई झाल्यास कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नियमित बगिच्यात येणारे हेमंत पटेल यांनी सांगितले की बगिच्यांमध्ये असलेल्या सुविधांमध्ये आता व्यापक प्रमाणात सुधारणा झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांचा त्रास यामुळे कमी झाला आहे. मनोज मेश्राम यांनी बगिच्यात झालेल्या सुधारणांवर समाधान व्यक्त करीत यापुढेही अशा सुविधा कायम मिळत राहतील,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
भारत माता-डॉ. आंबेडकर उद्यानात ‘रोझ गार्डन’
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील भारत माता-डॉ. आंबेडकर उद्यानात ‘रोझ गार्डन’ विकसित करण्याचा आदेश दिला आहे. तेथे पिवळा गुलाब, समर फ्लो, डबल डिलाईट, फस्ट प्राईज, ब्लैक लेडी आदी गुलाबाचे रोपटे लावण्यात आले आहेत. हा बगीचा पूर्व नागपूर परिसरातील प्रमुख बगिच्यांपैकी क आहे. या बगिच्यात तीन ग्रीन जीम आहेत. मुलांसाठी खेळाचे साहित्य आहे. दररोज सुमारे एक हजारांवर नागरिक तेथे येतात. बगिच्यात असलेला युद्धकालीन टँक भारतीय सेनेचा गौरवशाली इतिहास सांगत आहे.