नागपुरात कोरोनाची दहशत त्यात पावसाची हजेरी

नागपूर : दिवसभर कसलाही मागमूस नसताना मंगळवारी रात्री ११.२० च्या सुमारास शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे दिवसभराच्या उकाड्यात रात्री दिलासा मिळाला. असे असले तरी कोरोनाच्या दहशतीत सारेच असताना पाऊस आला. त्यामुळे अनेकांनी अवेळी आलेल्या पावसाबद्दल चिंताही व्यक्त केली.
रात्री अचानकपणे आकाशात ढग दाटून आले. विजांचाही गडगडाट झाला. त्यानंतर काही वेळ पाऊस आला. शहराच्या बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी दिली. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठाही खंडित झाला. मंगळवारी सकाळी आकाश ढगाळलेले होते. मात्र दुपारनंतर स्वच्छ ऊन पडले. दिवसभर हवेत उकाडाही जाणवत होता.
त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागल्याची जाणीव व्हायला लागली होती. कोरोनाचे विषाणू उन्हात टिकत नाहीत. त्यामुळे लवकर ऊन तापावे, अशी सर्वांची अपेक्षा असतानाच पाऊस आला. निसर्गाच्या या खेळामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव मात्र उमटले.