पिली नदी होईल स्वच्छ व सुंदर

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात युद्धपातळीवर नदीस्वच्छता
‘कोरोना’मुळे शहरात असलेल्या ‘लॉकडाऊन’चा फायदा घेत नदी स्वच्छता अभियानाच्या इतिहासात पहिल्यांदाच मार्च महिन्यात अभियानाला सुरुवात झाली आहे. नदी स्वच्छता अभियानांतर्गत पिली नदीच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर असून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला आहे. लॉकडाऊननंतर घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पिली नदीचा विनाअडथळ्याचा आणि गाळ, कचरामुक्त स्वच्छ व सुंदर प्रवाह अनुभवता येणार आहे.
नदी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गाळ काढून नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरणही करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांतर्फे कचरा टाकण्यात येतो. मात्र दरवर्षी हा कचरा आणि गाळ काढून संरक्षक भिंतीला लागून ठेवला जायचा. यावर्षी तसे न करता संपूर्ण गाळ आणि कचरा नदीच्या बाहेर काढला जात आहे.
दरवर्षी काढलेला गाळ आणि कचरा नदीच्या संरक्षक भिंतीजवळ ठेवला जात असल्याने तो पावसाळ्यात पुन्हा वाहून नदीतच जायचा. पुन्हा जमा झालेला गाळ आणि कचऱ्यामुळे पाणी वाहून न जाता लगतच्या वस्त्यांमध्ये शिरायचे. मात्र, यावर्षी काढलेला गाळ इतरत्र नेला जात असल्यामुळे पावसाळ्यात हा धोका राहणार नाही, असा विश्वास मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.
यावर्षी नदीतून काढलेला गाळ हा ज्या सखल भागात पाणी साचते तेथे टाकण्यात येत आहे. यासोबतच नागरिकांना त्यांच्या उद्यानात बागकामासाठी आवश्यकता असेल तर हा गाळ उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर नद्यांची स्वच्छता केली जात आहे.
पिली नदीचे तीन स्ट्रेचमध्ये काम प्रगतीपथावर
नदी स्वच्छता अभियानांतर्गत पिली नदी स्वच्छता अभियानाचे कार्य प्रगतीपथावर आहे. पिली नदी चार स्ट्रेचमध्ये विभागण्यात आली आहे. ४.३ कि.मीचा गोरेवाडा ते मानकापूर एसटीपी पहिला स्ट्रेच आहे. मानकापूर एसटीपी ते कामठी रोड हा ५.३ कि.मी.चा दुसरा स्ट्रेच, कामठी रोड ते जुना कामठी रोड नाका हा ३.५ कि.मी.चा तिसरा स्ट्रेच तर जुना कामठी रोड नाका ते पुढे ३.६ कि.मी.चा चौथा स्ट्रेच आहे. पिली नदीची स्वच्छता करण्यात येणारी एकूण लांबी १६.७० कि.मी. इतकी आहे. सध्या पिली नदीच्या तीन स्ट्रेचमध्ये काम प्रगतीपथावर असून मोठ्या प्रमाणात तेथून गाळ उपसण्यात आला आहे. पिली नदी स्वच्छतेसाठी ५ पोकलेन, ३ जेसीबी आणि ६ टिप्पर कार्यरत आहेत. नदी स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. २७ मार्च रोजी कामाचा प्रारंभ झाला. २० दिवसांत नदी स्वच्छता पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊन असल्यामुळे शहरातील सर्वच नागरिक घरात आहेत. लॉकडाऊनपूर्वी नागरिकांनी बघितलेली नदी गाळ आणि कचरा असलेली होती. नदीला प्रवाह नव्हता. लॉकडाऊननंतर लोकं जेव्हा घराबाहेर पडतील तेव्हा लोकांना नदीचा विना अडथळ्याचा प्रवाह दिसेल, असा विश्वास मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.
महामेट्रोसह विविध विभागाचे सहकार्य
नदी स्वच्छता अभियान लोकसहभागातून होत असते. यासोबतच शासनाच्या विविध विभागाचेही यात सहकार्य मिळते. यावर्षी सुरू असलेल्या नदी स्वच्छता अभियानात महामेट्रोसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे सहकार्य मिळत आहे. यासोबतच मनपाच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, स्वच्छ भारत मिशन, यांत्रिकी अभियांत्रिकी, उद्यान विभाग या सर्वांचा समन्वय असून प्रत्येक विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.