‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून भावनिक आवाहन- आयुक्त तुकाराम मुंढे
कोव्हिड-१९ बद्दल आजही बहुतांश नागरिकांना नेमकी माहिती नाही. त्याची उत्पत्ती, त्याचा प्रसार, त्याची भयावहता, त्याचे गांभीर्य, त्यावरील उपाययोजना आदींबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी समाधान केले. कोव्हिड-१९ म्हणजे नेमके काय हे सांगताना त्यांनी वैद्यकीय दृष्टिकोनातून अगदी सोप्या भाषेत नागरिकांना त्याची माहिती करुन दिली. एकदा कोरोना विषाणू गळ्याखाली उतरला की नंतर उपचार कठीण होऊन बसतो. त्यामुळे त्याची लक्षणे आढळताच तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. वेळीच उपचार घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार क्वॉरंटाईन व्हा आणि समाजाला आपल्यापासून धोका होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते. मात्र यावर्षी सार्वजनिक रूपाने जयंती साजरी करता येणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या विचाराला आपल्याला आत्मसात करायचे आहे. कोरोनाला हरविण्यासाठी आता ख-या अर्थाने संघटित होउन संघर्ष करण्याची वेळ आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर घरातच नतमस्तक होउन सर्वांनी कोरोनाशी घरात राहून लढण्याचा संदेश द्यावा, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
अनेक ठिकाणी गरजूंना मदत पोहोचत नसल्याचे नागरिकांनी लक्षात आणून देताच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, नागपूर महानगरपालिका युद्धपातळीवर अशा गरजूंना अन्न पोहोचविण्याचे काम सामाजिक संस्थांच्या सहकार्याने करीत आहे. यासाठी ०७१२-२५३९००४ हा दूरध्वनी क्रमांक आहे. ज्यांना रेशनची गरज आहे अशा गरजूंना रेशनसुद्धा पुरविण्यात येत आहे. त्यामुळे असे काही आढळल्यास नागरिकांनी मनपाला माहिती द्यावी. मनपाची चमू गरजूंपर्यंत अन्न पोहोचविण्यास कटीबद्ध आहे, असेही ते म्हणाले.
कॉटन मार्केट आणि नव्याने सुरू करण्यात आलेले इतर पाच मार्केट मनपाने बंद केले. यात नियोजन फसले, यंत्रणा कमी पडतेय की नागरिक आवरत नाही. या प्रश्नावर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, मनपा प्रशासन जे निर्णय घेते ते परिस्थिती पाहून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय घेत असते. कॉटन मार्केटमध्ये कितीही आवरण्याच्या प्रयत्न केला तरी प्रचंड गर्दी व्हायची. त्यामुळे ते बंद करून इतर काही ठिकाणी मैदानावर गाड्या पाठविणे सुरू केले. मात्र, तेथेही नागरिकांनी सामाजिक अंतर पाळले नाही म्हणून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अनेक शेतकरी संघाशी संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून वॉर्डावॉर्डात भाजीपाला पोचविला जात आहे. सध्यातरी नागरिकांना भाजीपाला मिळण्यात कुठली अडचण नसल्याचे ते म्हणाले.
कोव्हिड-१९ हा नागरिकांच्या जीवावर उठलेला या शतकातला भयानक विषाणू आहे. त्याविषयी सर्वप्रथम जाणून घ्या. स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्या. शासनाच्या निर्देशाचे पालन करा. घरीच राहा आणि कोरोनाशी योद्धा बनून लढा द्या, सामाजिक अंतर पाळा, अत्यावश्यक कामाकरिताच घराबाहेर पडा. लवकर घरी जा. घरात प्रवेश करण्याअगोदर हात स्वच्छ धुवा, असे भावनिक आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी शनिवारी (ता. ११) नागरिकांशी संवाद साधला आणि प्रश्नांना उत्तरे दिली.
पूर्वी मास्क वापरण्याची गरज नाही, असे सांगितले गेले मात्र नंतर मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले, असे का या प्रश्नाला उत्तर देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, राज्यात कोरोनाने जेव्हा शिरकाव केला तेव्हा त्याची तीव्रता कमी होती. त्यानंतर हळू हळू संख्या वाढत गेली. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार केंद्र आणि राज्य शासन वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करते. पूर्वी शासनाच्या निर्देशासनुसार मास्क प्रत्येकाने वापरणे बंधनकारक नव्हते. मात्र, आता कोरोनाचा प्रसार आणि वाढती रुग्णसंख्या बघता आपल्यापासून दुसऱ्याला आणि इतरांपासून आपल्याला रोग होऊ नये, ही काळजी घेण्यासाठी शासनानेच मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे मास्कचा वापर करा आणि स्वत:सोबतच इतरांनाही सुरक्षित ठेवा, असे त्यांनी सांगितले.