मनपाच्या अनेक विभागात आता १०० टक्के उपस्थिती
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबी देतानाच उत्तम प्रशासनाचे धडेही गिरविले. त्याचा परिणाम महिनाभरातच दिसून आला असून अनेक विभागात सतत राहणारी ६० टक्क्यांची उपस्थिती थेट १०० टक्क्यांवर पोहोचली आहे. कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आलेख अचानक वाढल्याने त्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवार २८ जानेवारी रोजी पदाची सूत्रे स्वीकारली. तत्पूर्वी २३ जानेवारी रोजी नागपूर महानगरपालिका मुख्यालयात विविध विभागात उशिरा येणारे आणि अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची सरासरी ४१ टक्के होती. अर्थात ५९-६० टक्के कर्मचारी उपस्थित राहत होते. आजच्या तारखेत ही उपस्थिती सरासरी ९६ टक्के झाली आहे.
पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दररोज सकाळी ९.३० वाजता कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश ही दिले होते. बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून हजेरी लावावी. याचा सकारात्मक परिणाम कर्मचाऱ्यांवर झाल्याचे सध्या असलेल्या उपस्थितीवरून लक्षात येत आहे. १४ फेब्रुवारी रोजी सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य (दवाखाने), ग्रंथालय, समाजकल्याण, कर आकारणी विभाग, जलप्रदाय विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के होती.
शिक्षण, प्रकाश, स्थावर, उद्यान, आरोग्य (स्वच्छता), एलबीटी, लोककर्म, स्लम, नगररचना या विभागामध्ये ९५ ते ९९ टक्के उपस्थिती आहे. अन्य विभागातीलही कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती ९० टक्क्यांच्या वर असून ह्या उपस्थितीची सरासरी ९६ टक्के इतकी आहे. उपस्थितीची ही टक्केवारी मागील १५ दिवसांत अशीच असल्याने आयुक्तांचे कौतुक होत आहे.