मनपा आयुक्तांनी वाढविले आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची घेतली भेट : काळजी घेण्याचा दिला प्रेमळ सल्ला
नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (ता. ६) घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढविले. ३० लाख नागपूरकरांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:चीही काळजी घ्या, असा प्रेमळ सल्ला देत सर्व कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची ही भेट आकस्मिक होती. कोरोनाविरुद्धचा लढा लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याच्या हेतूने त्यांनी सर्व्हेक्षणाला निघण्याच्या वेळेवर आयसोलेशन हॉस्पीटलमध्ये पोहोचून त्यांच्याशी संवाद साधला. समोर अचानक आयुक्त तुकाराम मुंढे यांना बघून तेथे उपस्थित आणि सर्वेक्षणाला निघण्याच्या हेतूने बसमध्ये बसलेले सारेच कर्मचारी अवाक् झाले. विशेष म्हणजे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत: बसमध्ये चढून सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या कामाचे कौतुक करीत सर्वांशी हितगूज साधले. आपल्याला आपला जीव धोक्यात घालून कार्य करावे लागत आहे. त्यामुळे आपली काळजी आपणच घ्यायला हवी, असे म्हणत एका सीटवर एकाच महिलेने बसण्यास सांगत निर्देशाचे पालन करण्यास सांगितले. सगळयांना कोविड-१९ च्या गाइडलाइन्स प्रमाणे सर्वेक्षण मध्ये माहिती गोळा करण्याचा सल्ला देत आयुक्त म्हणाले कि नागपूरकरांची आशा तुमच्यावर आहे. आपल्या सगळयांना मिळून कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचे आहे.
यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील इतर भागाचाही दौरा केला. यात त्यांना जेथे-जेथे लोकं एकत्र गर्दी करून दिसलीत तेथे गाडीतून उतरून त्यांना ‘सोशल डिस्टंसिंग’चे धडे दिले. ‘कोरोना’ला हरविण्यासाठी, साखळी तोडण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगत लॉकडाऊनदरम्यान घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन केले.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सकाळीच शहर पालथे घातले. मानेवाडा परिसरात एका रेशन दुकानासमोर धान्य घेण्यासाठी गर्दी असल्याचे दिसले. तेथे सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्याचे लक्षात येताच ते स्वत: तेथे पोहोचले. सर्वांना तीन-तीन फुटाच्या अंतरावर उभे करून सामाजिक अंतराचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन केले. राशन दुकानदाराला तातडीने दुकानासमोर तीन-तीन फुटावर खुणा करण्यास सांगितले.
अनेकांना आश्चर्याचा धक्का
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनपा आयुक्त मुंढे स्वत: शहरात फिरत असल्याचे बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले. गर्दी असलेल्या ठिकाणी गाडी थांबल्याचे बघताच आणि त्यातून येणारा व्यक्ती दुकानाकडे येत असल्याचे बघून अनेकांना सुरुवातीला काही कळलेच नाही. मात्र, दुकानात पोहोचल्यावर ते मनपा आयुक्त तुकाराम मुंढे असल्याचे लक्षात येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.