मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांची माहिती : निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन
कोव्हिड-१९ ची साखळी खंडित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून कडक निर्बंध लावले आहेत. या निर्बंधाची अंमलबजावणी नागपुरातही होणार असून मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ५ एप्रिलचे रात्री ८ वाजतापासून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. रात्री ८ वाजतापासून सकाळी ७ वाजतापर्यंत संचारबंदी तसेच सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत जमावबंदी राहणार आहे. शिवाय मॉल, चित्रपटगृहे, हॉटेल, बार, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे, नाट्यगृहे, बाजारपेठ बंद राहणार आहेत. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. दरम्यान, सार्वजनिक वाहतूकही नियमानुसार सुरू राहील. हे निर्बंध ३० एप्रिलपर्यंत राहणार असून नागपूरकरांनी या निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.