महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
• कँसर पीडित चिमुकल्यांनी केली माझी मेट्रो सफर
• ‘कॅन किड्स-किड्स कॅन’ आणि महामेट्रोच पुढाकार
नागपूर १५: आज ‘इंटरनॅशनल चाइल्डहूड कॅन्सर अवेअरनेस डे’ आहे त्यानिमित्ताने तुकडोजी पुतळा चौकातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कँसर हॉस्पिटलमधील ३० मुलांनी नागपूर मेट्रोच्या एक्वा मार्गिकेवर सीताबर्डी ते लोकमान्य नगर आणि तेथून परतीचा प्रवास करीत मेट्रो सफरीचा आनंद घेतला. ‘कॅन किड्स-किड्स कॅन’ संस्थेच्या मदतीने हा दौरा आयोजित करण्यात आला होता.
नागपूर मेट्रो सुरु झाल्यापासून मेट्रो सफर करण्याची प्रचंड जिज्ञासा नागरिकांमध्ये दिसत आहे, त्या अनुषंगाने या मार्गिकेवर दिवसेंदिवस गर्दीही वाढते आहे. व्यावसायिक प्रवासी सेवा सुरु असतांनाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कँसर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या चिमुकल्यांची मेट्रो सफारीची इच्छा पूर्ण करण्यासाठी येथील सेवा निवृत्त डॉक्टर कृष्णा कांबळे आणि ‘कॅन किड्स-किड्स कॅन’ या सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने ३० कँसर पीडित मुले आणि त्यांचे पालक अश्या ६० जणांची विशेष सफर महा मेट्रोने आयोजित केली होती.
कॅन्सर सारख्या दुर्धर आजारापासून मोठमोठ्यांना वैताग येतो त्याचे उपचार अत्यंत कठीण असतात. वर्षानुवर्षे उपचार चालू असल्याने या रोगाचा पेशंट त्रासून जातो. हि मोठ्यांची अवस्था असतांना २ वर्षांपासून १६ वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांचे काय होत असेल. घोडेले परिवारातील धनुष्य हा ३ वर्षाचा मुलगा आणि त्याचीच सक्खी बहीण जान्हवी ५ वर्षांची दोघांनाही डोळ्यांचा कँसर असल्याचे कळले तेव्हा या परिवारावर दुःखाचा कुठला डोंगर कोसळला असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. हि दोन्ही चिमुकली आई-बाबांचा हात धरून मेट्रो राईड साठी आले होते. पूर्व पराठे या ११ वर्षाच्या अत्यंत हुशार चुणचुणीत चिमुरडीला २ वर्षाआधी फायब्रॉईडचा कॅन्सर असल्याचे समजले खडतर परिस्थितून उपचार घेऊन ती आज पूर्णपणे बारी होण्याच्या मार्गावर आहे परंतु पुढे अनेक वर्ष तिला हे उपचार चालू ठेवावे लागणार आहे.
प्रवासादरम्यान ह्या चिमुरडीने नागपूर मेट्रो बद्दलची संपूर्ण माहिती इतरांना ठणठणीत आवाजात करून दिली. विजया खेर्डेकर या द्वितीय वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीला ओव्हरीचा कॅन्सर होता त्यानं शिक्षणावर परिणाम झाला ह्याचे तिला वैषम्य आहे. काहीतरी करून दाखवायचे आहे हि जिद्द तिच्या बोलण्यातून जाणवत होती. ह्याच सफरीवर आलेले आणखी बरीच ४ ते ७ वर्षाआतील मुलं ब्लड कॅन्सरला लढा देत असल्याचे डॉक्टर आणि संस्थेच्या लोकांनी सांगितले. आयुष्याने अश्या कठीण प्रसंगावर आणून उभे केल्यावर आयुष्याशी दोन दोन हात केल्याशिवाय उपाय नसतो. अश्यावेळी या चिमुकल्यांना छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंदही फार महत्वाचा असतो. हाच आनंद त्यांना मिळावा म्हणून नागपूर मेट्रोचा सफर ह्यांना घडवण्यात आला. हा सफर करीत असतांना तोंडावर मास्क घातलेली मुले देखील स्मित करीत होती त्यांच्या डोळ्यातून त्यांचा आनंद ओसंडून वाहत असल्याचे स्पष्ट दिसत होते. एलिव्हेटेड पुलावरून अंबाझरी भागातून मेट्रो जात असतांना खिडकीतून दिसणारा तलाव आणि वन परिसर मुलांनी अतिशय उत्सुकतेने न्याहाळला. यावेळी त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. यावेळी गगन भरारी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची मदत लाभली, कविता पाटील, वर्षा वासनिक, अरुणा ताकसांडे, वर्षा पाटील आणि आशिष खडके ह्यांचे सहकार्य लाभले.