लॉकडाऊनमध्ये घरपोच सेवेसाठी ई-कॉमर्स कंपन्या पुन्हा मैदानात
करोना रोखण्यासाठी २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांनी पुन्हा एकदा किराणा वस्तूंची घरपोच सेवा सुरु केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन ई-कॉमर्स कंपन्यांची यंत्रणा कार्यरत झाली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात व्यत्यय आल्यामुळे काही राज्यांमध्ये ई-कॉमर्स सेवांच्या डिलिव्हरींवर परिणाम झाला होता. त्यामुळे कंपन्यांनी सर्व सेवा खंडीत केली होती. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास खुली ठेवण्याचे निर्देश दिले. या आदेशाअंतर्गत किराणा माल आणि अत्यावश्यक मालाची डिलिव्हरी करण्यास ई-कॉमर्स कंपन्यांना परवानगी देण्यात आली.
फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, बिगबास्केट, ग्रोफर्स, झोमॅटो, स्विगी या कंपन्यांना सरकारने घरपोच सेवा देण्याकरिता स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून दिला आहे. या आश्वासनामुळे यातील बहुतेक कंपन्यांनी किराणा माल आणि अत्यावश्यक वस्तू पोहोचवणाऱ्या कंपन्यांनी आपल्या सेवा पुन्हा सुरू केल्या आहेत. ग्राहक एकमेकांमध्ये सामाजिक अंतर राखत ई-कॉमर्स सेवा देत आहे. फ्लिपकार्टसारख्या कंपन्या कर्मचारी, खासकरून डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह आणि ग्राहकांसाठी सुरक्षित आणि निर्विघ्न पद्धतीने पुरवठा-साखळी बळकट करीत आहेत. काही श्रेणींमधील मागणी सुरूच राहण्याची शक्यता असून फ्लिपकार्टने पुरवठा-साखळीच्या आणि डिलिव्हरीच्या अंतिम टप्प्याच्या सुरक्षिततेसाठी सर्व आस्थापना आणि डिलिव्हरी वाहने (किराणा मालासाठी) यांच्या नियमित निर्जंतुकीकरणाच्या माध्यमातून बहुविध प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत. विक्रेत्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात पुरेशा प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात यादृष्टीने त्यांना शिक्षित आणि प्रोत्साहित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
फ्लिपकार्टने डिलिव्हरी एग्झिक्युटिव्हजचा आरोग्यविमा आणि जीवनविमा उतरवण्यात आला आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला क्वारंटाइन करावे लागले तर त्या दिवसांचा पूर्ण पगार दिला जाणार आहे, असे कंपनीने म्हटलं आहे. कंपनीने किराणामाल पुरवठा सुरू केला असून आता आमच्या पुरवठा केंद्रांमध्ये काम पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांत किराणामालाच्या मागणीत मोठ वाढ झाली असून ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आमची क्षमता वाढवत आहोत, असे ‘फ्लिपकार्ट’चे मुख्य कॉर्पोरेट अफेअर्स अधिकारी रजनीश कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले की, स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा व केंद्र सरकारकडूनही सहकार्य मिळत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक भावना आहे.
एकीकडे देश कोविड-१९ कोरोना विषाणूशी जोरदार लढा देत असतानाच आमच्या डिलिव्हरी टिम्स व पुरवठा साखळीवर नजर ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यांना जीवनविमा, वैद्यकीय संरक्षण देण्यात येत असून जर एखादा कर्मचारी विषाणू संसर्गाने बाधित झालाच, तर त्यांना आवश्यक ती आर्थिक व वैद्यकीय मदत देण्याचीही आमची पूर्ण तयारी आहे, असेही रजनीश कुमार यांनी स्पष्ट केले.