१३८ युवकांना मिळाला रोजगार
नागपूर:- फॉर्च्युन फाउंडेशन आणि नागपूर महानगरपालिकेच्यावतीने आयोजित सहाव्या युथ एम्पावरमेंट समिटच्या दुसऱ्या दिवशी १३८ युवकांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली. युवकांसाठी तीन प्रेरक व्याख्यानांचे आयोजनही या प्रसंगी करण्यात आले होते.
पहिले मार्गदर्शनपर सत्र पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर होते. ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे संस्थापक कौस्तव चॅटर्जी यांनी पर्यावरण संवर्धन क्षेत्रात रोजगार आणि संबंधित क्षेत्रातील संधी याविषयी विस्तृत माहिती दिली. पॅरिस करारात भारत सहभागी झाल्यापासून पर्यावरण संवर्धन ही भारत सरकारची प्रमुख मोहिम झाली असल्याने केंद्रीय अर्थसंकल्पातही त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. या क्षेत्रात स्वयंरोजगारासह केंद्र तथा राज्य पातळीवरील प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरीची संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या क्षेत्राचा विस्तार मोठा असून, या संधींचा अभ्यास करून लाभ घेण्याचे आवाहन चॅटर्जी यांनी उपस्थित युवकांना केले. याशिवाय,खासगी कंपन्यांमध्ये नोकरी या विषयावर आशिष कोले यांनी तर विमा क्षेत्रातील संधींविषयी आयुर्विमा निगम अर्थात एलआयसीचे विकास अधिकारी अभिषेक शुक्ला यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर फॉर्च्युन फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आमदार प्रा. अनिल सोले यांच्यासह इतर पदाधिकारी विशेषत्वाने उपस्थित होते.
उमेदवारांमध्ये उत्साह
समिटमध्ये रविवार, १६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता मुलाखतींना सुरुवात होईल. शनिवारी एकूण ९,५०० उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. तांत्रिक रोजगारासाठी १२०० उमेदवारांची निवड झाली. रविवारी सात हजारांवर उमेदवार समिटला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे.