मनपा हद्दीतील शाळा ४ जानेवारी पासून होणार सुरू
मिशन बिगीन अगेन अंतर्गत नागपूर महानगरपालिका हद्दीतील शाळा, विद्यालये ४ जानेवारी २०२१पासून सुरू होणार आहेत. यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी (ता.२६) आदेश निर्गमित केले आहेत.
मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार कोव्हिड संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचना आणि अटींच्या अधीन राहून इयत्ता ९वी आणि १२वी चे वर्ग ४ जानेवारी २०२१पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी सर्व प्रकारच्या मार्गदर्शक सूचना आणि अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. शाळा प्रशासनाद्वारे शाळेमध्ये सुरक्षेच्या सर्व सुविधांची पूर्ती करणे आवश्यक आहे. शाळेमध्ये थर्मोमीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, सॅनिटायजर, साबण, पाणी आदी सर्व आवश्यक वस्तूंची उपलब्ध असण्याबाबत शाळा प्रशासनाने दक्षता घ्यावी.
शाळा सुरू करताना शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी कोव्हिडची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असून त्यांना चाचणीचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापन समितीकडे सादर करावे लागणार आहे. वर्गखोली तसेच स्टाफरूम मधील बैठक व्यवस्थेमध्ये योग्य शारीरिक अंतर राखले जाईल, याची काळजी घ्यावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था करावी. कोव्हिड संदर्भातील सुरक्षेची काळजी घेणारे संदेश जसे मास्कचा वापर करा, शारीरिक अंतर राखा, स्वच्छता बाळगा आदी संदर्भात पोस्टर किंवा स्टिकर्स शाळेच्या दर्शनी भागात लावावे.
या सर्व प्रक्रियेमध्ये शाळा व्यवस्थापनाने आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडणे गरजेचे आहे. शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्यासाठी किमान ६ फूट शारीरिक अंतर राखले जाईल यासाठी विशिष्ठ चिन्हे लावणे, शारीरिक अंतर राखण्यासाठी येण्याचे व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणा-या बाणाच्या खुणा करणे याबाबात शाळा व्यवस्थापनाने योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. शाळेत व परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखण्याकरिता शाळेचा परिसर दररोज स्वच्छ ठेवणे, स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करणे, याबाबत संपूर्ण साहित्याची उपलब्ध करणे हे प्रत्येक शाळेला बंधनकारक आहे. उपरोक्त सर्व बाबींच्या तपासणीसाठी खाजगी शाळांकरिता शिक्षणाधिकारी, जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाला जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर मनपाच्या शाळांची तपासणी करणे ही मनपाच्या शिक्षणाधिका-यांची जबाबदारी राहिल. वर्गखोल्यांमध्ये हवा खेळती असावी याची कटाक्षाने काळजी घेण्यात यावी. वर्गखोल्यांच्या खिडक्या, दारे खुली ठेवूनच शिकविण्यात यावे.
उपरोक्त सर्व बाबींची पूर्तता करूनच शाळा सुरू करण्यात याव्यात. उपरोक्त बाबींची पूर्तता झाली असल्याचा अहवाल जिल्हा परिषद नागपूर माध्यमिक शिक्षणाधिकारी, मनपा शिक्षणाधिकारी यांनी मनपा आयुक्तांना सादर करणे बंधनकारक आहे.
News Credit To NMC