नागपूर शिवसेनेत मोठे फेरबदल, संजय राऊतांनी घातले लक्ष, आता दोन महानगरप्रमुख
नागपूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी नुकताच नागपूर दौरा केला. त्यांच्या भेटीनंतर उपराजधानीतील शिवसेनेत मोठे फेरबदल करण्यात आलेत. नागपूर शिवसेनेत आता दोन महानगरप्रमुख असणार आहेत. किशोर कुमेरीया यांची नागपूर महानगरप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळं आता प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरीया हे दोन महानगरप्रमुख असणार आहेत. शहर सहसंपर्क प्रमुखपदी मंगेश काशीकर यांची निवड करण्यात आली. तसेच विशाल बरबटे आणि प्रवीण बरडे यांनाही जबाबदारी देण्यात आली.
महानगरपालिका निवडणुकीपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने किशोर कुमेरीया यांची निवड करण्यात आल्याची अशी माहिती आहे. प्रमोद मानमोडे यांच्याकडे दक्षिण-पश्चिम, मध्य आणि पश्चिम नागपूरची महानगरप्रमुखपदाची जबाबदार असेल. तर किशोर कुमेरिया यांच्याकडे पूर्व, दक्षिण आणि उत्तर नागपूरची जबाबदारी असेल. मंगेश काशीकर हे सहसंपर्कप्रमुख असतील.
दोन महानगर प्रमुखांव्यतिरिक्त तीन शहरप्रमुख नेमण्यात आले आहेत. नितीन तिवारी यांच्याकडे पश्चिम आणि उत्तर नागपूरची शहरप्रमुख पदाची जबाबदारी असेल. दीपक कापसे यांच्याकडे दक्षिण-पश्चिम व दक्षिण नागपूरची शहरप्रमुख पदाची जबाबदारी असेल, तर प्रवीण बरडे यांच्याकडे पूर्व आणि मध्य नागपूरची शहरप्रमुख पदाची जबाबदारी असेल. याशिवाय शहर संघटक म्हणून किशोर पराते यांना जबाबदारी देण्यात आली आहे.