जामठ्याहून परतणाऱ्या क्रीडाप्रेमींसाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ – पोलीस आयुक्त अमितेशकुमार
नागपूर: भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामना शुक्रवार, 23 सप्टेंबर रोजी जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियमवर होणार आहे. खेळानंतर शहरात येणाऱ्या लोकांची वाहतूक कोंडी होते. हे टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जामठा ते रहाटे कॉलनी असा ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार केला आहे. दरम्यान, प्रेक्षक सोडून इतर रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
२१ ते २४ असा हा बंदोबस्त राहणार असून विदेशी दर्शक आणि पाहुण्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष असणार आहे. स्टेडियमच्या १३ प्रवेशद्वारांवर पोलीस राहणार असून मैदानामध्ये विदर्भ क्रिकेट असोशिएशनने खासगी सुरक्षा रक्षकांची व्यवस्था केली आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून विशेष नियोजन करण्यात आले आहे. तब्बल ६०० पोलीस यासाठी तैनात असतील. ७ पोलीस उपायुक्त, १० सहायक आयुक्त, ३५ निरीक्षक, १३८ सहनिरीक्षक आणि १६०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. मैदानाच्या काही अंतरावर वाहनतळ असून मैदानापर्यंत बससेवा देण्यात आली आहे, अशी माहितीही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.