नागपूरचा “कुत्ते वाले बाबा का आश्रम” – भटक्या कुत्र्यांसाठी एक शाही आश्रम
जुन्या नागपूरच्या वस्तीचा एक भाग असलेल्या शांतीनगर इथे ‘कुत्ते वाले बाबा का आश्रम’ आहे. इथून जाताना ठिकठिकाणी असणाऱ्या भटक्यांना चुकवणं शक्य नसतं. दररोज संध्याकाळी, केवळ इथे राहणाऱ्या कुत्र्यांसाठीच नाही, तर आश्रमाच्या बाहेर राहणाऱ्या कुत्र्यांसाठीही जवळपास ५० किलो गव्हाच्या पिठाच्या चपात्या तयार केल्या जातात. या चपात्या दुधात भिजवल्या जातात आणि नंतर स्वयंसेवक त्या भटक्या कुत्र्यांना खाण्यासाठी अनेक ठिकाणी ठेवतात. आश्रमाचे भक्त याकडे धार्मिक कार्य म्हणून पाहतात. या आश्रमाचे विश्वस्त एकनाथ कवडे यांनी सांगितलं, की, आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलं, की जे प्राणी स्वतःसाठी बोलू शकत नाहीत, त्यांना खायला घालणे हे देवाचं काम, कर्तव्यच आहे.
हे आश्रम, कुत्र्यांसाठी केलं जाणारं हे काम कसं सुरू झालं यावर बोलताना विश्वस्तांनी सांगितलं, की आमचे गुरु परमहंस रामसुंबर बाबा शंभर वर्षांपूर्वी नागपुरात आले. ते याच ठिकाणी आले होते. त्यांनीच हे सुरू केल्याचं सांगण्यात आलं. त्यांनी सर्व भटक्या प्राण्यांना खायला दिलं आणि त्यांच्यात चांगलं नातंही निर्माण झालं. प्राण्यांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या क्षमतेच्या आख्यायिका दूरवर पसरल्या. त्यानंतर बाबांची लोकप्रियता वाढली.
सध्या आश्रमात अंदाजे ६० कुत्रे आहेत, पण दरवर्षी महिनाभरात ही संख्या शंभरच्या पुढे जाते. नियमानुसार, कुत्रा जिथे बसला आहे तिथून आम्ही त्याला कधीही हाकलून देत नाही, असंही या आश्रमाच्या विश्वस्तांनी सांगितलं. यापैकी एकाही कुत्र्याला नाव दिलेलं नाही, यामागे तसं काही कारणही नाही, असंही म्हणाले. कुणी कुत्र्याला नावाने हाक मारली तरी आमची काही हरकत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
आश्रमातील कुत्र्यांची संख्या सतत बदलते, प्रजनन हंगामही वाढतो असंही त्यांनी सांगितलं. अनेक असे भटके कुत्रे आहेत जे केवळ अन्नासाठी इथपर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर हे आश्रम कधीही सोडत नाहीत. अनेक कुत्र्यांचा इथेच जन्म झाला आहे. नोकरी करणारे असे लोक आहेत जे त्यांचे पाळलेले कुत्रे इथे सोडतात. तसंच असेही कित्येक जण आहेत जे आता कुत्र्यांना पुढे सांभाळू शकत नाहीत किंवा काळजी घेऊ शकत नाहीत ते लोकही त्यांच्या पाळीव प्राण्याला या आश्रमात सोडतात.