Lakshmi Pujan 2019 Date & Shubh Muhurat
हिंदू धर्मियांसाठी महत्वाचा सण म्हणजेच दिवाळी (Diwali) यंदा 25 ऑक्टोबर पासून सुरु झाला आहे. असं असलं तरी दरवर्षी प्रमाणे नरक चतुर्दशीच्या (Narak Chaturdashi) मुहूर्तावर अभ्यंगस्नान केल्यावर सेलिब्रेशनला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. तुम्ही यंदाचे दिवाळीचे वेळापत्रक पहिले असेल तर लक्षात येईल की यंदा दिवाळीचे काही मुहूर्त एकत्र जुळून आले आहेत. आज देखील नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त एकाच दिवशी आला आहे. ज्योतिषांच्या माहितीनुसार हा खूपच दुर्मिळ योग आहे. याशिवाय, यंदा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी एक खास योगायोग जुळून आला आहे. यंदा 37 वर्षांनी पहिल्यांदाच चित्रा नक्षत्रावर, अमावस्येच्या दिवशी आणि सूर्य देवतेच्या पूजनाच्या वारी म्हणजेच रविवारी लक्ष्मी पूजन तिथी आहे.परिणामी या शुभ दिनी देवी देवतांची यथासांग पूजा केल्याने मोठा फायदा होणार असल्याचे मानले जाते. तत्पूर्वी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी थोडक्यात जाणून घेऊयात..
लक्ष्मीपूजन 2019 तिथी आणि शुभ मुहूर्त
दिवाळी लक्ष्मीपूजनासाठी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.06 ते रात्री 8.37 या मुहूर्तावर पूजा करणंं फायदेशीर आहे.
लक्ष्मीपूजन विधी
लक्ष्मीपूजनाला पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. तसेच तांब्यात श्रीफळ ठेवून त्याच्या बाजून पाच आंब्याची पाने ठेवतात. लक्ष्मीची मूर्ती पाटावर ठेवून पाटाच्या बाजूने केळीची पाने लावली जातात. तसेच घरातील सर्व सोन्याचे दागिने, पैसे, आदी सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीला फराळाचा आणि लाह्या-बत्तास्यांचा नैवेद्य दाखवला जातो. आपल्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहावे, अमावस्येला ‘लक्ष्मी’ आणि ‘कुबेर’ या देवतांचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे तर, कुबेर हा संपत्ती संग्रहक असल्याचे म्हटले जाते. तसेच या खास दिवशी नवीन केरसुणीची पूजा केली जाते. या केरसुणीने घरातील कचरा बाहेर टाकला जातो तसाच आपल्यातील वाईट सवयी, विचार बुद्धिबाहेर टाकले जावेत यासाठी प्रार्थना केली जाते.धार्मिक मान्यतेनुसार, घरात उत्साह, स्वच्छता, सौंदर्य, आनंद पाहून लक्ष्मी सर्वत्र संचार करते, म्ह्णून या दिवशी आनंदी आणि निश्चिन्त असणे आवश्यक आहे.