आता ग्राहकांसाठी ‘फार्म टू होम’ विशेष ॲप
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनीही विशेष खबरदारी घेत घराबाहेर पडणे टाळावे. नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळाव्यात यासाठी मनपातर्फे आवश्यक सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे दुकानदार आणि ग्राहक या दोघांच्याही सुरक्षेच्या दृष्टीने दोन विशेष ॲप तयार करण्यात आले आहेत.
लॉकडाउनमध्ये जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून व ग्लोबल लॉजिक व नीती या कंपनीच्या पुढाकारातून ग्राहकांसाठी ‘फार्म टू होम’ (Farm to Home) हे विशेष ॲप तयार करण्यात आले आहे. याशिवाय दुकानातील उपलब्ध वस्तूंच्या साठ्याच्या नोंदणी व पुरवठ्यासाठी दुकानदार किंवा सेवा पुरवठादार यांच्याकरिता ‘बास्केट ओनर’ (Basket Owner) हे सुद्धा ॲप तयार करण्यात आले आहे.
ग्राहकांसाठीच्या ‘फार्म टू होम’ या ॲपद्वारे दुकानामध्ये उपलब्ध वस्तूंचा साठा आणि त्याच्या किंमती लक्षात घेउन ग्राहकांना आपली मागणी नोंदविता येईल. त्यानुसार आवश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा करण्यात येईल.
‘बास्केट ओनर’ हे ॲप दुकानदार किंवा सेवा पुरवठादारांकरीता तयार करण्यात आले आहे. यासाठी आधी दुकानदार किंवा सेवा पुरवठादारांना आवश्यक माहिती सादर करून नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर दुकानामध्ये उपलब्ध वस्तू अथवा मालाची माहिती, साठा, त्याची किंमत याचा तपशील सादर करावा लागेल.
याशिवाय जे दुकानदार स्वत:च्या मनुष्यबळाद्वारे घरपोच सेवा देण्यास इच्छूक आहेत त्यांनीही ॲपवर नोंदणी करावी किंवा संपर्क क्रमांकावरून माहिती कळवावी, असे आवाहनही मनपाद्वारे करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत मनपाच्या अधिकृत nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरून हे दोन्ही ॲप डाउनलोड करता येउ शकतात. ज्यांना ॲप डाउनलोड करणे शक्य नाही त्यांनी ०७१२-२५२२२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क साधणा-या ग्राहक आणि दुकानदारांना जीवनावश्यक वस्तूंसंदर्भात आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. ग्लोबल लॉजिक (Global Logic) कंपनीद्वारे दोन्ही ॲप तयार करण्यात आले असून त्याला ऋत्विक जोशी यांच्या नीती (NEETII) या कंपनीचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे.