परत जायचे आहे घरी 20 हजारांवर बंगाली कारागिरांनाही
नागपूर:- विशेष म्हणजे हे सर्व कारागिर पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर आणि नंदीग्राम या भागांतील असून त्यांनाही घरी जाण्याची आस लागली आहे. नागपुरात हे सर्व कारागीर भाड्यांच्या खोल्यांमध्ये वास्तव्य करीत आहेत. सध्या कामे बंद असल्याने, या कारागिरांकडे पैसे नाही. त्यामुळे घर कसे चालवायचे हा प्रश्न आहे. परीवार त्यांच्या गावात आहे. असे असताना नागपुरात अडकल्याने कारागीर मानसिकरित्या त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने याची दखल घेत त्यांच्या जाण्याची सोय करण्याची गरज आहे.
टेलरिंगच्या कामात असलेल्या कारागिरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी इतर राज्यांच्या मजुरांना ज्याप्रमाणे रेल्वेची सोय उपलब्ध करून दिली, तशी सोय प्रशासनाने उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. शिवाय आता त्यांच्या खाण्यापिण्याचीही सोय करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत लालगंज सुधार संघर्ष समितीमार्फत व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, यापुढे प्रशासनाने दखल घेणे आवश्यक आहे.
राज्यातून उत्तरप्रदेश आणि बिहार येथील मजूर आणि नागरिकांचे पलायन सुरू आहे. या मजुरांसाठी नागपूर रेल्वे स्टेशन येथून विशेष रेल्वे गाड्यांची सोय करून देण्यात येत आहे. आतापर्यंत बऱ्याच रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. उत्तरप्रदेश आणि बिहारप्रमाणे नागपुरातील तांडापेठ, लालगंज, नाईक तलाव, झाडे चौक, पाचपावली, गुलशननगर, टेकानगर, कमाल चौक, यशोधरा नगर आदी परिसरांत मोठ्या संख्येने पश्चिम बंगाल येथून टेलरिंगच्या व्यवसायासाठी आलेले कारागीर वास्तव्य करतात.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. याचा फटका पश्चिम बंगालमधून येथे आलेल्या कारागिरांना बसला आहे. या कारागीरांवरही संकट ओढविले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आम्हालाही आपल्या गावी नेण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता या नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ते येथे येतात. काम झाल्यावर आपल्या गावी परत जातात. याशिवाय अनेक ठिकाणी ज्वेलरी दुकानांतही यांपैकी काही कारागीर काम करतात. मात्र, कोरोनामुळे या नागरिकांचा व्यवसाय बुडाला आहे.