NMC

इलेक्ट्रिक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा

नागपूर शहरात ४० नव्या इलेक्ट्रिक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी (ता.३०) झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत यासंबंधीच्या ठरावाला मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यामुळे आता मनपाच्या परिवहन सेवेमध्ये ४० नव्या इलेक्ट्रिक बस रूजू होणार आहेत.

मंगळवारी (ता.३०) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात परिवहन समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, समिती सदस्य नितीन साठवणे, नरेंद्र वालदे, सदस्या विशाखा बांते, मनिषा धावडे, वैशाली रोहनकर, रूपाली ठाकुर, परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, निगम सचिव डॉ.रंजना लाडे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरूण पिपरूडे, विनय भारद्वाज, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे आदी उपस्थित होते.

मनपाच्या परिवहन सेवेमध्ये दाखल होणा-या या ४० बसेस करिता निविदा मागविण्यात आली होती. यामध्ये मे.ई.व्‍ही.ई.वाय. ट्रान्सपोर्ट प्रा.लि. या कंपनीद्वारे प्रति किलोमीटर ७२ रुपये ९९ पैसे एवढा दर देण्यात आला. मात्र यावर निगम आयुक्तांची कंपनीच्या प्रमुखांशी चर्चा झाल्यानंतर ६६ रुपये ३३ पैसे प्रति किमी दर निश्चित करण्यात आला आहे. या बसेसकरिता प्रति बस ४५ लाख रुपये केंद्र शासनाकडून देण्यात येणार आहे. मनपाला केवळ ६६ रुपये ३३ पैसे प्रति किमी एवढ्याच दराची भरपाई करावी लागणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

या बसमध्ये नियुक्त कर्मचा-यांना किमान वेतन नियमानुसार वेतन देण्याचे निर्देश ही परिवहन सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी दिले आहे. त्यांनी केंद्र शासनाकडून लवकरात लवकर करार करण्याबाबत निर्देशित केले असून बैठकीत प्राप्त मंजुरीअन्वये यथाशिघ्र करारनामा करण्यात येईल, असे सांगितले.

या नव्या ४० इलेक्ट्रिक बसेसमुळे मनपाच्या परिवहन व्यवस्थेला अधिक गती प्राप्त होणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त या बसेसमुळे नागरिकांना सुविधा मिळणार आहेच शिवाय शहरातील पर्यावरण संतुलित राखण्यातही भर पडणार असल्याचे मत परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी व्यक्त केले.

News Credit To NMC

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.