दिवसभर पावसाची रिमझिम: थंडाव्यात वाढ
नागपूर:- शहरात सतत रिमझिम सुरू असलेल्या पावसामुळे वातावरण चांगलेच थंड झाले आहे. गुरुवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस संध्याकाळपर्यंत सुरू होता. मधेच ढग बरसायचे, मधेच थांबायचे पण लवकरच पुन्हा रिमझिम सुरू होत असल्याचा सर्वांनी अनुभव घेतला. सततच्या पावसामुळे सूर्य देवताही ढगाआडच दडून होता.
गुरुवारी पहाटे ते सायंकाळ 5.30 या वेळेत शहरात हवामान खात्याने 15 मिमी पावसाची नोंद केली. यापूर्वी बुधवारी सायंकाळपासून सकाळी 8:30 वाजेपर्यंत शहरात 30.5 मिमी पावसाची नोंद झाली. कधी हलका, कधी मध्यम पाऊस पडल्यामुळे शहरातील अनेक गल्लीबोळांत आणि रस्त्यावरही पाणी दिसले. विभागाने शहरातील कमाल तापमान 25.8 अंश नोंदविले, जे सरासरीपेक्षा 4.9 अंश कमी होते. किमान तापमान 23.3 अंश नोंदविले गेले.
उद्या मुसळधार: हवामान खात्याने येत्या 24 तास म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी बहुतांश भागात हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तविला आहे, परंतु 15 ऑगस्ट रोजी एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 15 ऑगस्ट रोजी बर्याच भागात हलका पाऊस होईल आणि 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. त्याचबरोबर विभागाने 16 ऑगस्टला हलका पाऊस आणि 17 रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
92.43 टक्के भरला तोतलाडोह: सतत पडणा-या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा बराच वाढला आहे. 12 ऑगस्टपर्यंत जलसंपदा विभागाने दिलेल्या अहवालानुसार पेंच तोतलाडोह प्रकल्पात 92.43 टक्के पाणीसाठा झाला आहे. नवेगावखैरी प्रकल्पात ज्यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो तेथे 91.69 टक्के क्षमतेचा साठा झाला आहे. इतर प्रकल्पांमध्ये विभागाने पुरेसे पाणी साचल्याची माहिती दिली आहे.