मुंढे गेले आणि दोघांत हे वाटून गेले……
हे दोघे म्हणजे एक सत्तापक्ष व दुसरी जनता. सत्तापक्ष ज्यांचेशी त्यांचे कधीच जमले नाही, त्यांचे गोटात आनंद तर दुसरा गट नागपुरातील सामान्य जनता, जी त्यांचे रूपात एक कर्तव्यदक्ष, सचोटीचा अधिकारी पाहत होती त्यांचे पदरी निराशा देऊन मुंढे अवघ्या सातच महिन्यांत बदलीमुळे निघून गेले.
या बदलीमुळे सतत चालू असलेल्या सत्तापक्ष व आयुक्तांमधला रस्सीखेचाचा तणाव आता नागरिकांना पुढे अनुभवावयाला मिळणार नाही. महापौर जोशी यांनीही “वैयक्तिक काही नाही, पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा” असा संदेश दिला, पण प्रत्यक्षात दोघांचे शीतयुद्ध सर्वांनाच ठाऊक आहे! कालचे दिनी बदलीचे वृत्त प्रदर्शित होताच ती बातमी वनव्याप्रमाणे सोशल मीडियावर पसरली. काहींनी याला सत्तापक्षाचा विजय तर काहींनी नागपूरच्या नागरिकांचे नुकसान असेही ठरवून टाकले.
मुंढे जेव्हा नागपुरात आले, त्यांनी पालिकेत वर्षोगणती एकाच जागी असलेले पदाधिकारी बदलून पालिकेत आपली पकड मजबूत केली. त्यांची कामाची पद्धतच तशी असेल, पण कोरोना प्रसारानंतर बरीचशी सूत्रे त्यांनीच ताब्यात घेतली त्यामुळे सत्तापक्ष आणि आयुक्त यांच्यात श्रेयावरून जे शीतयुद्ध सुरू झालं ते थेट केंद्रीय मंत्री गडकरी यांचे कडे तक्रार होईपर्यंत ते उघड रंगले.
मीडिया सोबत त्यांचं चांगलंच जमत होतं, ते स्वतः कुशलतेने मीडियाचा वापर करीत स्वतः सर्व माध्यमांवरील प्रोफाईल्सवर कामांबाबत नागरिकांस तत्परतेने माहिती देत. पण नागपूर स्मार्ट सिटी सस्टेनेबल डेवलपमेंट प्रकल्पात संचालक पदावर दावा सांगत व्यवहार केले असल्याने महापौर जोशींनी यास उघडपणे विरोध केला. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले, पुढेही अनेकदा हरकती झाल्या, नुकतेच कोरोना उपाययोजनांमध्ये घोषित व्यवस्था व रूग्णांस झेलाव्या लागणा-्या प्रत्यक्षातल्या तफावतींबाबत न्यायालयानेही त्यांचेवर ताशेरे ओढले होते, पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्वतःला पॉझिटिव्ह असल्याचे प्रसारमाध्यमांवर लिहिले. अशात आता पुढे काय? ही सर्वांचीच उत्सुकता होती, पण पुढचेच दिवशी बदलीचे पत्र माध्यमांवर फिरले.
या आकस्मिक कलाटणी मुळे सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आलेले आहे. सत्तापक्ष व समर्थकांकडून आनंदी पोस्ट दिसतायत, इतर पक्ष याविरोधात लढायचे आवाहन करतोय, तर सामान्य नागरिक मात्र स्वतःच्या व शहराच्या नुकसानीच्या काळजीत असल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या मुंढेविषयीच्या उत्कट भावना व्यक्त केलेल्या आढळत आहेत, त्यावरूनच त्यांनी सर्वसामान्यांचे मनात घर केले होते हे निश्चित दिसून येते.