गणेशोत्सव: तलावांमध्ये विसर्जनावर निर्बंध: मूर्ती घरीच विसर्जित कराव्यात~ महापौर
नागपूर:- कोरोना साथीच्या संकटाकाळामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. महामारी कायदा लागू आहे, रोगप्रसार रोखण्यास्तव जमावबंदी आहे त्यामुळे महापौर संदीप जोशी यांनी लोकांना त्यांच्या घरी मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, नागपूरातील सर्व तलावांमध्ये विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार कृत्रिम तलावांची व्यवस्था मनपाने जागोजागी केली आहे.
शुक्रवारी त्यांनी या व्यवस्थेचा आढावा घेतला. फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा आणि गांधीसागर तलाव येथे जाऊन अधिका-यांकडून याबाबत व्यवस्थेची व यंत्रणेची माहिती घेतली. उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती पिंटू झलके, संदीप जाधव, वीरेंद्र कुकरेजा, प्रकाश वराडे, हरीश राऊत, किरण बगडे, आदी याप्रसंगी उपस्थित होते.
कृत्रिम तलावांची संख्या 50 टक्क्यांनी कमी:
कोरोना संसर्गामुळे विसर्जनस्थळावर गर्दी होऊ नये, यास प्राधान्य दिले जात आहे. दरवर्षीच्या तुलनेत कृत्रिम तलावांची संख्या यंदा 50 टक्क्यांनी कमी केली गेली आहे. आवश्यकतेनुसारच कृत्रिम तलाव वापरण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी सर्वांना केले आणि विसर्जनाच्या वेळी फक्त 2 जणांनाच परवानगी असेल असे सांगीतले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही तलावांवर विसर्जन करण्यास येऊ नये, संबंधित जवळचे जागेत मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले. यावर्षी “विसर्जन तुमच्या दारात” ही संकल्पना मनपाद्वारे राबविली जात आहे. 10 झोनमध्ये विसर्जन रथाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचे संपर्क क्रमांकही मनपाच्या अधिकृत सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.