पूरपुरामुळे 7765 घरे नष्ट, 1602 जनावरांचा मृत्यू: दुपारी चारपर्यंत आर्मी, एनडीआरएफ, एसडीआरएफची टीम मदतकार्यात
नागपूर: जिल्ह्यातील पूरग्रस्त गावे व नागरिकांची संख्या आणखी वाढली आहे. जिल्ह्यातील 5 तालुक्यांवर गंभीर परिणाम झाला आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 5 तहसीलमधील एकूण 61 गावे बाधित झाली आहेत जिथून सेना, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तसेच स्थानिक नागरिकांच्या पथकांचे मदतीने 28104 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम केले आहे. या खेड्यांमध्ये राहणा-या 4911 कुटुंबांवर भलतेच संकट ओढवले आहे.
नागरिकांच्या मदतीसाठी 62 शिबिरे विविध जि.प.शाळा, मंदिर, सामाजिक इमारती इत्यादींमध्ये लावण्यात आल्या आहेत. या मदत शिबिरांमध्ये 6138 नागरिकांस ठेवण्यात आले आहे. 7765 लोकांची घरदारे जमीनदोस्त झाली आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगीतले की, 50 जनावरांचा गोठ्यांचा नाश झाला आहे आणि 1602 जनावरे मरण पावली आहेत. त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील 5 तहसीलमधील 58 खेड्यांमध्ये 55000 लोक बाधित झाले आहेत. यापैकी 14813 लोकांना पूरातून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. 62 मदत शिबिरात 1369 लोकांना ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
1345 चा बचाव: जिल्ह्यातील गोंडपिंप्री, पवनी येथे अडकलेल्या नागरिकांना बोटींच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. सकाळपासूनच सैन्य, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके बचाव व मदतकार्यात व्यस्त होती. सायंकाळी चार वाजेपर्यंत बचावकार्य आटोपले. या कालावधीत, चिचघाट येथून 243, अमरमारा येथून 628, टेकेपारमधून 391, उमारीमधील 1, गोंडपिंपरी येथील 50 आणि पवनी येथून 32 लोकांना बाहेर काढण्यात आले. टिम्सनी एकूण 1345 लोकांस सुरक्षित ठिकाणी हलविले. नागरिकांनी पथकातील सैनिकांचे आभार व्यक्त केले. याशिवाय स्थानिक खलाशी, नागरिक व लोकप्रतिनिधींनीही नागरिकांना बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले. नाविकांनी नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींनी गावक-यांना वाहनांद्वारे बाहेर काढले. राजोला येथील, 65, हरदोली येथील ,32, म्हसोली येथील 17, नवेगाव चिचघाट येथील, 86, पिपरी मुंजे येथील 56 असे एकुण 256 जणांना स्थानिक लोकांनी सुरक्षित ठिकाणी हलवले.
आरोग्य तपासणी, अन्नाचे वितरण: जिल्ह्यातील 62 मदत शिबिरांमध्ये, पूरग्रस्तांच्या आरोग्य तपासणीसह, खाद्यपदार्थांची व्यवस्था प्रशासनाकडून केली गेली. जिल्ह्यात सर्वात जास्त बाधीत पारशीवणी, मौदा, कामठी आणि कुही तहसील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 20 हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांवर पूराने ताबा घेतला व पिकांची राखरांगोळी केली आहे. नद्यांच्या तटालगत 1 ते 2-2 कि.मी.पर्यंत नदीचे पाणी गेले आहे, ज्यामुळे शेतात वाळू भरली आहे. पाणी उतरू लागले आहे आणि परिस्थिती सामान्य होईल तशी तितक्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याबाबत अधिका-यांनी माहिती दिली आहे.
चंद्रपूर-गडचिरोलीतही नुकसान: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तहसीलमधील 21 खेड्यांमध्ये 4859 लोकांस पुरफटका बसला आहे. 3159 जणांस सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, आरमोरी आणि गडचिरोली तहसीलमधील 10 गावे बाधित झाली आहेत. येथे 2098 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आणि 1375 नागरिकांना मदत शिबिरांमध्ये ठेवण्यात आले आहे. संपूर्ण नागपूर विभागात 14 तहसील पूर बाधित झाले आहेत. 90,858 नागरिक त्यापासून प्रभावित झाले आहेत.
पटोले यांची बोटीद्वारे भेट: विधानसभेचे सभापती नाना पटोले यांनी नावेच्या सहाय्याने भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर परिसरातील पाण्याखाली गेलेल्या गावांचा दौरा केला. त्यांनी पुरामुळे झालेल्या विध्वंसांचा आढावा घेतला आणि त्यानंतर निवारा गृहात जाऊन पीडितांना मदत करण्याचे आश्वासन दिले.