नागरी हक्क जनजागृति बाबत पोलिस विभागातर्फे मोहिम: महत्वाचे कार्यालयांत दर्शनी फलक लावणार
भ्रष्टाचारास पायबंद घालण्याकरिता लोकांनी पुढे यावे म्हणुन नागपूर पोलीस आयुक्तालया अंतर्गत जनतेस आवाहन करणारे फलक सर्व पोलीस स्टेशन्स व वरिष्ठ अधिका-यांच्या कार्यालयात दर्शनी भागात लावण्याकरिता मा. डाॅ. श्री. भूषण कुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त, नागपूर यांचे हस्ते वितरित करण्यात आले. पोलीस आयुक्तांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात उचलेले हे एक मोठे पाउल समजण्यात येते.
आपले कायदेशीर काम करण्याकरिता लोकसेवकाने लाच मागितल्यास त्याबाबत नेमकी कुठे तक्रार करावी? कोणत्या कार्यालयात जावे? याबाबत सर्व सामान्य जनता मोठया प्रमाणात अनभिज्ञ असतेे. जनतेस त्यांच्या कायदेशीर हक्काबाबत माहिती मिळण्याकरिता व दाद मागणे सोईचे जावे म्हणुन जनतेस आवाहन करणारे फलक तयार करण्यात आले आहेत.
या फलकामध्ये ”भ्रष्टाचार थांबविणे हे तुमच्या हाती आहे. भ्रष्टाचार नष्ट केला तरच देश मजबुत होवु शकतो, लाच घेणे आणि देणे हा गंभीर गुन्हा आहे. देशाच्या विकासाला खिळ घालणारा भ्रष्टाचार आपण सगळे मिळुन नष्ट करु. आपले कायदेशीर काम करण्याकरिता कोणि लाच मागितल्यास आपण खालील कार्यालयाशी संपर्क साधा.“ असे जनतेस आवाहन करण्यात आले असुन त्याखाली पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांचे कार्यालयाचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक नमूद करण्यात आले आहे.
दिनांक 03/09/2020 रोजी संध्याकाळी 04.00 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात कोविड-19 बाबत सर्व खबरदारी बाळगुन आवाहनाचे फलक वितरित करण्याचा एक छोटेखानी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. या प्रसंगी मा. डाॅ. श्री. भूषण कुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी पोलीस उपायुक्त श्री. राजमाने व श्री. साळी यांना फलक वितरित केले. यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. राजेश दुद्दलवार हे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना मा. डाॅ. श्री. भूषण कुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी भ्रष्टाचारा विरुध्द तक्रार करण्याकरिता सर्वसामान्य नागरिकांस त्यांच्या अधिकाराची जाणिव होवुन त्याबाबत व्यापक जनजागृती होणे अंत्यत आवश्यक असल्याचे सांगितले. जनतेस आवाहन करणारे फलक नागपूर पोलीस आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ अधिका-यांची कार्यालये, सर्व पोलीस स्टेशन्स, वाहतुक शाखा, विशेष शाखा, गुन्हे शाखेसह ईतर सर्व कार्यालयात लावण्यात येणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर तर्फे दरवर्षी राबविण्यात येणा-या जनजागृती सप्ताह कार्यक्रमा दरम्यान आयोजित करण्यात येणा-या विविध कार्यक्रमांचे व जनतेस आवाहन करणा-या फलकाचे त्यांनी कौतुक केले. या फलकाच्या माध्यमातुन लोकांमध्ये मोठी जनजागृती घडावी ही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. राजेश दुद्दलवार यांनी नागपूर शहर पोलिसांप्रमाणे ईतर शासकीय विभागांनी सुद्धा असे फलक आपआपल्या कार्यालयात लावुन भ्रष्टाचार निर्मुलनाच्या लढाईत सहभाग घ्यावा असे आवाहन केले.