सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा: लवकरच धावणार, विदर्भ, सेवाग्राम, गरीबरथ
नागपूर:- लॉकडाऊननंतर मंद असलेल्या रेल्वे सेवेने आता वेग पकडण्यास सुरवात केली आहे. ऑक्टोबरपासून सुरू होणारा सणासुदींचा विचार करता रेल्वेने इतर गाड्यादेखील सुरू करण्याची तयारी केली आहे. यात नागपूरहून मुंबईला जाणा-या विदर्भ आणि सेवाग्राम एक्स्प्रेस आणि पुण्याला जाणा-या गरीबरथ एक्सप्रेसचा समावेश आहे.
या सर्व गाड्या जवळपास वर्षभरच हाऊसफुल्ल चालणा-या गाड्या आहेत. कोरोना कालावधीत स्वस्त प्रवास वाहतुकीच्या आशेने नागपूर ते मुंबई आणि पुण्याकडे जाणा-या प्रवाश्यांसाठी ही एक दिलासादायी बातमी ठरू शकते.
यापूर्वी रेल्वे विभागाने नागपूर ते मुंबई दरम्यान दुरंतो एक्सप्रेस चालविण्याच्या सूचना दिल्या होत्या पण नंतर त्याऐवजी विदर्भ आणि सेवाग्राम एक्स्प्रेस चालविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
१० पासून आरक्षणाचे निर्देश: सर्व झोन व मंडळांना याव्यतिरिक्तही काही विशेष गाड्या पुन्हा रुळावर आणण्यासाठी तयारी सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. यात नागपूर ते मुंबई 12139/40 सेवाग्राम एक्सप्रेस व 12105/06 विदर्भ एक्सप्रेस शिवाय 12135/36 नागपुर-पुणे-नागपुर एक्सप्रेस और 12113/14 गरीबरथ एक्सप्रेस तसेच 11039/40 गोंदिया-कोल्हापुर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ही समाविष्ट आहे.
मात्र, आताही इतर गाड्यांप्रमाणेच त्यांना विशेष रेल्वेचे नाव देऊनच चालविण्यात येईल. ऑर्डरमध्ये असेही लिहिले आहे की दिवाळी आणि छठ पूजा पाहता या रेल्वे सेवा 15 आणि 20 ऑक्टोबरपासून सुरू कराव्या लागतील. त्यामुळे सर्व रेल्वे विभागांनी त्यांच्या गाड्यांमध्ये 10 आणि 15 ऑक्टोबरपासून या गाड्यांमध्ये आरक्षण सुरू करावे.