45 केंद्रांवर घेण्यात येणार यूपीएससी पूर्व परीक्षा
नागपूर:- नागरी सेवा (पूर्व) परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 4 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी शहरात 45 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये 17701 परीक्षकांचा समावेश असेल. परीक्षेसाठी पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक यांचेसह सुमारे 1000 अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.
याशिवाय, परीक्षा अबाधित घेता यावी यासाठी 45 स्थानिक तपासणी अधिका-यांची नेमणूकही आयोगाने केली आहे. यावेळी परीक्षा पद्धति बदलली आहे. त्यानुसार पहिल्या सत्रासाठी सकाळी 9.20 वाजता आणि दुस-या सत्रासाठी दुपारी 2.20 वाजता उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.
यानंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश देण्यात येणार नाही. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी उमेदवारांना वेळेवर हजर राहण्याचे आवाहन केले आहे. परीक्षेच्या वेळी मास्क लावणे अनिवार्य आहे. तसेच, हॅन्ड सॅनिटायझर देखील ठेवले पाहिजे. प्रवेश पत्र, ओळखपत्र, ब्लॅक बॉल पॉइंट पेन यांच्यासह आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार उमेदवार त्यांच्याबरोबर साहित्य बाळगू शकतात.