कोरोना मृतांच्या कुटुंबियांना मदत नाही: भाजपचे शिष्टमंडळ जिल्हाधिका-यांना भेटले
नागपूर:- भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष प्रवीण दटके, गिरीश व्यास यांनी अनेक योजनांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. यामध्ये संजय निराधार योजना, श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या एक वर्षापासून योजनेचे लाभ मिळने बंद झाल्याने त्यांना भेडसावत असलेल्या समस्या दूर करण्याची मागणी केली आहे. कोरोना संक्रमण काळात ज्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाला आहे, त्याला राज्य सरकारकडून २०,००० रुपये मदत देण्यात आलेली नाही.
७ दिवसांत न्याय न मिळाल्यास नागपूर शहर व जिल्ह्यात भाजप लाभार्थ्यांसह तीव्र आंदोलन पुकारेल असा इशारा देण्यात आला. बावनकुळे म्हणाले की, तहसीलदारांना समिती नसल्यास बैठक घेण्याचा व निधी वितरित करण्याचा अधिकार आहे.
ते म्हणाले की, शहरातील पालकमंत्री नितीन राऊत याकडे लक्ष देत नाहीत आणि या अन्यायामुळे गरीब जनता नाराज आहे. या वेळी अर्चना डेहनकर, संजय बंगाले, भोजराज डुम्बे, संजय चौधरी, विनोद कन्हेरे, किशोर वानखेड़े, महेंद्र राउत, संजय बालपांडे, रविन्द्र डोंगरे, गोपाल बोहरे, महेंद्र भुगांवकर, घनश्याम चौधरी, नरेंद्र लांजेवार उपस्थित होते.