नागपूरकर युवकांचा जत्था लेह-लडाखला रवाना विविध राज्यांमध्ये लसीकरणासाठी जनजागृती करणार
नागपूर, १५ जुलै- कोरोना लसीकरणासाठी जनजागृतीसाठी इंडीयन क्लब आफ रॉयल इन्फिल्ड या संस्थेचे युवक-युवती बुलेटने नागपूरहून आज सकाळी लेह-लडाखलाला रवाना झाले. महापौर दयाशंकर तिवारी यांनी झिरो माईल्स येथून या जत्थ्याला पहाटे ५ वाजता पांढरा झेंडा दाखविला.
इंडीयन क्लब आफ रॉयल इन्फिल्डचे (आयकोर) सदस्य असलेले युवक-युवती कोरोना लसीकरणासाठी लोकांमध्ये जनजागृती करणार आहेत. लसीकरणाबद्दल लोकांमध्ये असलेल्या गैरसमजुती हे युवक दूर करणार आहेत. या जत्थामध्ये अभय साहू, अमित लोणारे, ललित अरोरा, अरिहंत भुसारी, जिगर हंसोरा, अक्षय दासरवार, सौरभ ठवले, कमलेश सक्सेना, पियूष कावळे, मैत्रया चुटे, मिलिंद मुटकुरे, प्रशांत कनोजे, रोशन गौडा, रोहित आगरे, यश धारपुरे, अतुल तेटे, निखिल कडू, राजकुमार असवानी, आयुष शंभुवानी, मुक्ता चंदानी, डॉ. प्रियंका श्रीवास, दीपाली पाटील, शैलेश चौकसे, विवेक सोनटक्के, सोनू माहोरे, किरण कामडी, संतोष मालोदे, शंकर गबाळे, अजय पटवारी, कार्तिक गुप्ता व सारंग बुराडे यांचा समावेश आहे.
युवकांचा हा उपक्रम स्तुत्य- महापौर दयाशंकर तिवारी
कोरोना लसीकरणासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नागपूरहून लेह-लडाखपर्यंत बुलेटने जाण्याची संकल्पना निश्चितच कौतुकास्पद आहे. लेह-लडाखला जाण्याचा मार्ग खडतर आहे. या काळात ते लसीकरणासाठी जनजागृती करीत समाजापुढे नवा आदर्श या युवकांनी घालून दिल्याचे महापौर तिवारी यांनी सांगितले व युवक-युवतींना शुभेच्छा दिल्या.
महापौरांचा साधेपणा – आले दुचाकीने
महापौर दयाशंकर तिवारी या युवकांचा जत्था रवाना करण्यासाठी पहाटे ५ वाजता झिरो माईल्सवर उपस्थित झाले होते. यावेळी महापौर तिवारी स्वतः दुचाकी चालवित आले होते. इतक्या साधेपणाने महापौरांना जत्थातील युवक-युवतींनी प्रथमदर्शनी ओळखलेच नाही मात्र नंतर आपले महापौर एवढे साधे आहेत याचा सार्थ अभिमान त्यांना वाटला.