महापौरांशी चर्चा नंतर सफाई कामगारांनी संप मागे घेतला
शहरातील घराघरांमधून निघणारा कचरा संकलीत करून शहर स्वच्छ ठेवणा-या सफाई कर्मचारी आणि कचरा गाड्यांच्या वाहन चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. शहरातील पाच झोनमध्ये सेवा देणा-या ए.जी. एन्व्हायरो कंपनीच्या कर्मचा-यांना पगार कपात, आठवडी सुट्टी, कामाच्या तासांची निश्चिती, पूर्वसूचना न देता कामावरून कमी करणे असे अनेक अन्यायकारक समस्या भेडसावत आहेत. कर्मचा-यांच्या या समस्यांवर येत्या सात दिवसात संबंधित कंपनीद्वारे आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा कर्मचा-यांसह आपण स्वत: संपावर बसू, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे. महापौरांचे आश्वासनानंतर सफाई कामगारांनी आपला संप मागे घेतला.
ए.जी. एन्व्हायरो कंपनीच्या सफाई कर्मचारी व कचरा गाड्यांच्या चालकांच्या समस्यांसंदर्भात कर्मचा-यांच्या शिष्टमंडळाद्वारे महापौरांना निवेदन देण्यात आले होते. यावर महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (ता.१७) बैठक घेण्यात आली. महापौर कक्षात झालेल्या बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांच्यासह ए.जी. एन्व्हायरो कंपनीचे प्रतिनिधी, कर्मचारी नेते मुकेश शाहु आदी उपस्थित होते.
ए.जी. एन्व्हायरो कंपनीद्वारे शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या पाच झोनमधील कचरा संकलीत करण्यात येत असून कंपनीद्वारे मनमानी कारभार सुरू आहे. कर्मचा-यांच्या वेतनात कपात करून दर महिन्याला अनियमितरित्या वेतन दिले जाते. याशिवाय भविष्य निवार्ह निधीची (पी.एफ.) पावती न देणे, राष्ट्रीय सणांच्या दिवशीही कामावर बोलावणे, कर्मचा-यांना वर्षभरासाठी एकच पोषाख देणे अशा अनेक समस्यांबाबत यावेळी कर्मचा-यांच्या प्रतिनिधीद्वारे महापौरांकडे तक्रार करण्यात आली.
या सर्व समस्यांवर गांभीर्याने दखल घेत दर महिन्याला ७ ते १० तारखेच्या आता नियमितरित्या कर्मचा-यांचे वेतन व्हावे. याशिवाय कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधी संबंधात सर्व कागदपत्रे मनपाच्या आरोग्य अधिका-यांकडे सादर करावे, असे निर्देश यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिले. राष्ट्रीय सणांच्या दिवशी विशेषत: १ मे कामगार दिनाच्याही दिवशी कर्मचा-यांना कामावर बोलावण्यात आल्याने कंपनीवर कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
येत्या सात दिवसात कंपनीप्रमुखांनी स्वत: उपस्थित राहून उपरोक्त निर्देशावर कार्यवाही करण्याचेही महापौरांनी बजावले.
कोणतिही पूर्वसूचना न देता विनाकारण ३० कर्मचा-यांना कंपनीद्वारे कामावरुन काढण्यात आल्याची माहिती विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी बैठकीत दिली. संबंधित प्रकार अत्यंत गंभीर असून कर्मचा-यांचा एकाएकी रोजगार हिरवल्याने आजच्या स्थितीत त्यांच्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे. यासंदर्भात गांभीर्याने दखल घेत कर्मचा-यांच्या हिताशी संबंधित सकारात्म निर्णय घेण्याची मागणी यावेळी ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी महापौरांना केली.
संबंधित प्रकार गंभीर असून कंपनीद्वारे तात्काळ या सर्व कर्मचा-यांना कामावर नियुक्त करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.
News Credit To:- NMC