आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहा : आयुक्त तुकाराम मुंढे
लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे उद्भवणा-या आपत्तींसंदर्भात दक्ष राहणे गरजेचे आहे. कोरोनामुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. अशात पावसाळ्यामध्ये अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून चोविस तास नागरिकांच्या सुविधेसाठी चमू तत्पर असायला हवी. एकूणच संपूर्ण यंत्रणेबाबत प्लान तयार करून त्या दृष्टीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. यासाठी मनपाच्या प्रत्येक अधिका-याने येणा-या कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.
नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षामध्ये शुक्रवारी (ता.१५) नैसर्गिक आपत्ती मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रभारी उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, प्रभारी उपायुक्त तथा उदयान अधिक्षक अमोल चौरपगार, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.योगेंद्र सवाई, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, ए.एस.मानकर, शकील नियाजी, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, राजू भिवगडे, अशोक पाटील, सुभाष जयदेव, गणेश राठोड, हरीश राउत, स्नेहा करपे, किरण बगडे आदी उपस्थित होते.
बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विविध विषयावर चर्चा करून संबंधित विभागाद्वारे करण्यात येणा-या तयारीचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आपात्कालीन कक्षाचे नियोजन, झोन स्तरावरील नियंत्रण कक्ष, नदी व नाले सफाई संदर्भातील कार्यवाही, स्ट्रॉम वाटर ड्रेन, इमारतींचे बेसमेंट, मेनहोलवरील झाकण, जीर्ण व अतिजीर्ण घरांबाबत कार्यवाही, नदी व नाल्याच्या काठावरील अतिक्रमण, पाणी उपसण्याकरिता उपलब्ध पम्प, आपात्कालीन परिस्थितीत समाज भवन व मनपा शाळांची उपलब्धता, अग्निशमन विभागाची पूर्वतयारी, रस्त्यावरील धोकादायक झाडांची कटाई, साथरोगांबाबत पूर्वतयारी, सुरळीत पाणी पुरवठा या विषयांवर सविस्तर चर्चा करून तयारीचा यावेळी आयुक्तांनी आढावा घेतला.
शहरात कोणत्याही ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्या भागात कोणत्याही प्रकारे मनपाची सेवा खंडीत होउ नये याची कटाक्षाने काळजी घेणे आवश्यक आहे. सेवा खंडीत झाल्यास ती तात्काळ सुरू करून पुढे अविरत सुरू राहावी यासाठी आपत्ती व्यवस्थापनचे प्लान तयार करून ठेवण्यात यावे. याशिवाय नागरिकांच्या सुविधेसाठी मनपा मुख्यालयासह दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून त्याद्वारे त्वरीत प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. मनपाच्या चमूद्वारे तक्रार प्राप्त झालेल्या भागात कमीत कमी वेळेत पोहोचून समस्येवर कार्यवाही करणे आवश्यक आहे.
नागरिकांच्या सुविधेकरिता त्यांना त्वरीत मदत उपलब्ध व्हावी यासाठी ‘इंन्स्टंट रिस्पॉन्स टिम’ तयार करण्यात यावी. याशिवाय शहरातील जीर्ण घरे व इमारतींची यादी तयार करून त्यावर शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्यात यावी. तसेच शहराच्या तिनही नदीच्या आजूबाजूच्या खोल परिसरात असलेले अतिक्रमण काढण्याबाबतही कार्यवाही करा, असे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.
पावसाळ्यापूर्वी खोल भागातील जलवाहिनी, सिवर लाईन, ट्रंक लाईन या सर्वांची स्वच्छता होणे अत्यावश्यक आहे. शहरातून वाहणा-या नाल्यांची सविस्तर माहिती काढून जास्त पाउस आल्यास नाल्याशी संबंधित कोणता भाग जास्त बाधित होउ शकतो, याचा अभ्यास करून आधीच त्यावर काय उपाययोजना करता येतील, याचाही ‘मायक्रो लेव्हल प्लान’ तयार करण्यात यावा.
आपात्कालीन परिस्थितीमध्ये उपयोगात येणारे समाज भवन, शाळा यांचीही यादी करणे, आरोग्य विभागाद्वारे गरजेच्या वेळी आवश्यक असणा-या औषधांचीही तयारी ठेवणे या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून त्या संदर्भात सुक्ष्मस्तरावर काम करण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचेही निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.