BJP च वाढलं टेंशन, आमदार बच्चू कडू सहित या 4 अपक्ष आमदारांनी दिलं शिवसेना पक्षाला समर्थन
Maharashtra Government Formation Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर आता राज्यात सत्ता स्थापनेसाठी चढाओढ सुरू झाली आहे. महराष्ट्रात मतदारांनी शिवसेना-भाजपाला कौल दिला असला तरीही शिवसेना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याने आता भाजपा ही शिवसेनेची ऑफर स्विकारणार का? हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. भाजपासोबत शिवसेनेची सत्ता समीकरणं न जुळल्यास आता इतर पक्षांसोबत त्यांची बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यानुसार अपक्षांना आपल्याकडे खेचून सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. मीडीया रिपोर्ट्सनुसार, 4 अपक्ष आमदारांनी शिवसेनेला जाहीर समर्थन देण्यात आलं आहे. यामध्ये आमदार बच्चू कडू, राजकुमार पटेल, नरेंद्र भोंडेकर, आशिष जयस्वाल यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत. तर आता 4 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दर्शवल्याने शिवसेना समर्थक आमदारांची संख्या 60 वर पोहचली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या 2 आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी (26 ऑक्टोबर) मातोश्रीवर भेट घेतली आहे. यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या गोटात टेंशन वाढल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र विधानसभा सत्तेमध्ये समान वाट्यासाठी शिवसेना आमदार आक्रमक; अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाची मागणी.
सर्वसामान्य नागरिक आदिवासी,शेतकरी, मजूर आणि दिव्यांग्यांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती आणि शिवसेनेची वैचारिक भूमिका सारखीच असल्याने त्यांनी शिवसेनाला पाठिंबा दर्शवला आहे.असं सांगण्यात आलं आहे. प्रहारचे संस्थापक आमदार बचू कडू हे अचलपूर येथील तर आमदार राजकुमार पटेल हे मेळघाट येथील विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी त्यांच्या पाठिंब्याचे पत्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना पाठवले आहे.
24 ऑक्टोबर दिवशी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये भाजपाला 105 आणि शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळाला आहे. महाराष्ट्रात 145 ही मॅजिक फिगर गाठणारा पक्ष राज्यात सत्ता स्थापनेसाठी दावा करू शकतो.