मनपाच्या रुग्णालयात कोरोनाबाधित गरोदर मातेची प्रसूती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांमध्ये गरोदर मातांच्या प्रसूतीवर ब्रेक लागला होता. केवळ इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय अथवा शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथेच प्रसूती करता येत होती. नागपूर महानगरपालिकेने आता मंगळवारपासून पाचपावली सुतिकागृहात कोरोना पॉझिटिव्ह स्त्रियांच्या प्रसूतीची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे आज (ता. १५) एका कोरोनाबाधित गरोदर मातेची प्रसूती यशस्वीपणे करण्यात आली. माता आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.महापौर संदीप जोशी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी हे केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. गरोदर मातांच्या प्रसूतीची व्यवस्था मेडिकल अथवा मेयोशिवाय कुठेही नसल्यामुळे कोरोनाबाधित गरोदर मातांची फरफट होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबतची गरज ओळखून मनपाच्या रुग्णालयात व्यवस्था करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. महापौर आणि आयुक्तांच्या या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पाचपावली प्रसूतिगृहातील स्त्री रोग तज्ञ डॉ. संगीता खंडाईत (बालकोटे) आणि डॉ. वैशाली मोहकर यांनी पुढाकार घेतला. लक्षणे नसलेल्या कोव्हिड रुग्णांची प्रसूती करण्याची व्यवस्था केली. यासाठी त्यांनी खासगी रुग्णालयाच्या बधिरीकरण तज्ञ डॉ. आनंद कांबळे, बाल रोग तज्ञ डॉ. विंकी रुगवाणी आणि स्त्री रोग तज्ञ डॉ. दीप्ती शेंडे यांची मदत घेतली. ह्या सर्वांच्या मदतीने मंगळवारी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर ३० वर्षीय महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. हे त्यांचे दुसरे बाळ आहे.पाचपावली कोरोनाबाधित गरोदर मातांसाठी सुतिकागृहात २५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयात मनपाच्या वतीने डॉक्टर्स आणि परिचारिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.