स्मार्ट ॲक्शन प्लॅन तयार करा: पालकमंत्री राऊत
नागपूर:- शहरी व ग्रामीण भागात वाढलेली मृत्यू संख्या कमी करण्यावर भर देण्यात यावा असे सांगून राऊत म्हणाले की, लॉकडाउन हा पर्याय नसून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्यास कोरोना नियंत्रणात येऊ शकतो.जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी स्मार्ट अॅक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिल्या.
साथीच्या काळासाठी खासगी एजन्सीमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे, असे पालकमंत्री म्हणाले. मात्र, संबंधित एजन्सीकडे स्वच्छतेसाठी लागणारी साधनसामुग्री असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांची संख्या वाढत असल्याने अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे. विशेषतः चतुर्थ श्रेणी कर्मचारी व सफाई कामगार मोठ्या प्रमाणात लागणार आहेत, असे डॉ. मित्रा यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर व डॉ. दीपक सेलोकर उपस्थित होते.
उद्योग व्यवसाय नुकतेच रुळावर आले असून आता अर्थ चक्राला गती देण्याची वेळ असल्याचे पालकमंत्री म्हणाले.उपचारासाठी मेडिकलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची अँटीजेन टेस्ट करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. कोरोना विरुद्धच्या लढ्यात काही स्वयंसेवी संस्था स्वयंप्रेरणेने प्रशासनासोबत काम करण्यास तयार असून आजच्या बैठकीत याबाबत सादरीकरण करण्यात आले.