नागपूर विभागात १.३५ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान : देवेंद्र फडणवीस
प्राथमिक पाहणीनुसार, नागपूर विभागात पुरामुळे जवळपास १,३५,००० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी १०० टक्के नुकसान झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले की, नागपूर विभागात पूर आणि संततधार पावसामुळे सुमारे १,३५,००० हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हिंगणघाट आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पावसाने बाधित गावांना भेट दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूर विभागात विशेषत: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, असे ते म्हणाले.
प्राथमिक पाहणीनुसार, नागपूर विभागात पुरामुळे जवळपास १,३५,००० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी १०० टक्के नुकसान झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नुकसानीचे सर्वेक्षण सुरू असून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचे काम प्रशासन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पूर आणि पावसामुळे झालेल्या पीक आणि मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी केली आणि नुकसानीची घटनास्थळी पाहणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नवेगाव (पेठ) येथे उपमुख्यमंत्र्यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. बाधित नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत दिली जाईल आणि कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत, असे फडणवीस म्हणाले.