वेळीच चाचणीत सहकार्याने कोरोनामृत्युदरात निश्चित घट: सहकार्याचे आवाहन
नागपूर:- भीतीमुळे अथवा हलगर्जीपणामुळे अनेक नागरिक चाचणीकरिता पुढे येत नाही. विषाणू शरीरात गेल्यावर लक्षणे दिसतानाही उपचार घेत नाही. खासगी रुग्णालयात उपचार करतात. मात्र, खासगी रुग्णालय त्याची माहिती मनपाला देत नाही. दिवस निघून गेल्यावर त्रास जेव्हा अधिक होतो तेव्हा शेवटच्या क्षणी चाचणीकरिता येतात. मात्र तोवर वेळ निघून गेलेली असते. अशी प्रकरणे नागपुरात अधिक असल्याने उशिरा चाचणी आणि अंतिम क्षणी उपचारासाठी धडपड होत असल्याने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने केलेल्या ‘डेथ ॲनालिसीस’ नंतर हे तथ्य पुढे आले आहे.
सुमारे ५० ते ६० टक्के मृत्यू हे या प्रकारातील आहे. विषाणूचा संसर्ग झाल्यापासून चाचणी होत पर्यंतची परिस्थिती संबंधित व्यक्तीने गांभीर्य लक्षात घेऊन हाताळली, तातडीने चाचणी केली आणि पॉझिटिव्ह आल्यावर त्याला तातडीने उपचार मिळाला तर रुग्ण बरे होतात, हे सुद्धा सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे, नागरिकांना काही त्रास होत असेल, लक्षणे आढळून आली असतील तर ते खासगी रुग्णालयात जातात.
तेथे उपचार करतात. मात्र, कोरोनासदृश लक्षणे असलेली रुग्ण जर खासगी रुग्णालयात जात असतील तर त्याची माहिती मनपाच्या नियंत्रण कक्षाला किंवा आरोग्य विभागाला द्यावी, असे निर्देश आहेत. असे असतानाही खासगी रुग्णालयांकडून माहिती लपविली जात असल्याचे मनपा प्रशासनाच्या लक्षात आले आहे.
ही माहिती लपविल्यानेच रुग्ण लवकर समोर येत नाही. त्यामुळे हे सुद्धा कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे एक कारण ठरले आहे. अशी माहिती नागरिकांनी स्वत: कोरोना नियंत्रण कक्षाला देणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालयांनीही माहिती मनपाला कळविणे बंधनकारक आहे. तसे न झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्यान्वये रुग्णालयांवरही कारवाई करण्यात येईल.
यासंदर्भात मंगळवारी (ता. ११) नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील ‘कोरोना वॉर रुम’मध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त अमोल चौरपगार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, डॉ. प्रवीण गंटावार, डॉ. टिकेश बिसेन उपस्थित होते. विशेष म्हणजे या चर्चेत पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ. संजय झोडापे सहभागी झाले होते.
या चर्चेत सध्याच्या मृत्यूसंख्येवर चर्चा करण्यात आली. वाढत्या मृत्यूसंख्येवर नियंत्रण आणायचे असेल तर ज्या-ज्या नागरिकांना लक्षणे आहेत किंवा ज्यांना शंका आहे, अशा व्यक्तींनी तातडीने चाचणी करवून घेणे आवश्यक आहे. चाचणी लवकर झाली आणि त्यात संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला तर त्याच्यावर तातडीने उपचार शक्य आहे. यासाठी मनपाने शहरात सुमारे २१ ठिकाणी चाचणीची व्यवस्था केली आहे. दररोज पाच हजार चाचण्या होतील, हे उद्दिष्ट ठेवून काम सुरू आहे. या प्रयत्नातून मृत्यूदरावर नियंत्रण आणता येईल, असा विश्वास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.
ज्या-ज्या नागरिकांची चाचणी होत आहे, त्यांच्यावर मनपाच्या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. कोरोना कॉल सेंटरच्या माध्यमातून चाचणी झालेल्या व्यक्तीची, गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तीची, विलगीकरणातून निघालेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यात येत आहे. हा नियंत्रण कक्ष अधिक प्रभावी करण्यात येत असून मृत्यूसंख्या कमी करणे, हाच त्याचा उद्देश आहे. आतापर्यंत झालेल्या मृत्यूचा सखोल अभ्यास करून, त्याची कारणमीमांसा करून ते होऊ नये यासाठी भविष्यात काय उपाययोजना करता येतील, त्यादृष्टीनेही मनपा प्रशासन कार्य करीत आहे.
चाचणी करा, सहकार्य करा : आयुक्त
वाढती मृत्यूसंख्या कमी करायची असेल तर ज्या-ज्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत अथवा ज्यांना लक्षणे नाहीत मात्र जे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले अशा व्यक्तींनी तातडीने नजिकच्या कोव्हिड टेस्टींग सेंटर मध्ये जाऊन चाचणी करवून घ्यावी. यामुळे संक्रमित रुग्ण शोधण्यास मदत होईल. मनपाची यंत्रणा अधिकाधिक चाचण्या करुन घेण्यासाठी सज्ज असून त्याचा उपयोग नागरिकांनी करुन घ्यावा आणि वाढत्या मृत्यूसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.