मुंढे आणि पोलिसांत पुन्हा बेबनाव: नाईक तलाव बिर्याणी पार्टी प्रकरण
नागपूर:- लॉकडाऊन दरम्यान पोलिस विभाग आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील मतभेद सातत्याने समोर येत आहेत. यापूर्वी कोरोना विषाणूसंसर्ग नियंत्रणाचे श्रेयावरून वाद निर्माण झाला होता. आता नाईक तलाव बिर्याणी पार्टी प्रकरणामुळे संसर्गविषयक विधानाबाबत पुन्हा तसे पुढे येत आहे.
नाईक तलाव परिसरात अचानक कोरोना उद्रेक आढळल्याने मनपा आयुक्त मुंढे यांनी वक्तव्य दिले होते की, लॉकडाऊन संपल्याच्या आनंदात एका युवकाने आपल्या घरात बिर्याणी पार्टी आयोजित केली व बर्याच मित्रांनी त्या पार्टीत भाग घेतला. तेथून संसर्ग वेगाने पसरला. बिर्याणी पार्टीमुळे नाईक तलाव परिसरात कोरोना पसरल्याची बातमी देशभर पसरली. पोलिसांनी या विषयाचा तपास सुरू केला आणि बिर्याणी पार्टिच्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचा दावा केला. परिसरात अशी कोणतीही पार्टी झाली नाही.
या झोनचे डीसीपींनी 10 ते 12 जणांचे नोंदवलेल्या जबाबात ही गोष्ट आतापर्यंत खोटी ठरली असल्याचे सांगीतले. ज्या युवकावर पार्टी आयोजनाचा आरोप आहे, त्यानेही पोलिस चौकशीत स्पष्ट नकार दिलाय. इतकेच नव्हे तर शेजार भागात राहणा-या 10 ते 12 जेष्ठ नागरिकांचीही जबाब पोलिसांनी नोंदविलेत त्यानुसार असा कोणताही प्रकारचा कार्यक्रम परिसरात झाला नव्हता.
दाट लोकवस्तीच्या या भागात एकमेकांचे लहानसहान गोष्टीही लपून रहात नाही, परंतु सर्वजण तसा प्रकार घडल्याबाबत नकार देत आहेत, खोटी माहिती पसरवून नागरिकांत दहशत माजविण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. ही बातमी कोणी पसरविली त्याची कसून चौकशी केली जाईल. आणि कायदेशीर कारवाई देखील करू.
लॉकडाऊनमध्ये पार्टी कशी? चौकशीदरम्यान असे समजले की, ज्या तरूणावर पार्टी आयोजित करण्याचा संशय आहे तो रोजंदारी करतो. 26 मे रोजी तो रुग्णालयात गेला आणि 27 तारखेला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यानंतर 4 मे पर्यंत त्यास रुग्णालयातच दाखल केले होते. दरम्यान, 31 मे रोजी लॉकडाऊन शिथिल करण्यात आले.
अशा परिस्थितीत तो लॉकडाऊन संपल्यानिमित्त पार्टी कसा देऊ शकेल. या युवकाने स्वत: पोलिसांना सांगितले की, गेल्या 3 महिन्यांपासून टाळेबंदीमुळे काम बंद होते. त्याचे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. स्वत:ची प्रकृती बिघडली असता तो इतरांना पार्टी कसा देऊ शकेल?