डॉ. भागवत: कोरोनामुळे जीवनपद्धती बदलण्याची संधी
नागपूर:- अक्षय तृतीयेच्या पर्वावर नागपूर महानगरच्यावतीने त्यांच्या ऑनलाईन बौद्धिक वर्गाचे आयोजन करण्यात आले. “वर्तमान स्थिती आणि आमची भूमिका’ असा या बौद्धिकवर्गाचा विषय होता. युट्यूब व फेसबूकवर प्रसारित झालेल्या या बौद्धिकात सरसंघचालकांनी लॉकडाऊननंतरची जीवनशैली, स्वदेशीची जागृती आणि देशात सुरू असलेले सेवाकार्य या विषयांवर सविस्तर भाष्य केले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनला एक आव्हान समजा. स्वत:ची जीवनपद्धती बदलविण्याची ही संधी आहे. भारतात जे तयार होते त्याचा अवलंब करून जीवन कसे जगता येईल, याचा प्रत्येकाने विचार करावा. प्रत्येकाने निर्भय होऊन कोरोनाचा सामना करा. शांततेच्या मार्गाने व शासनाच्या सूचनांचे तंतोतत पालन करून लॉकडाऊन यशस्वी करा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
सद्यस्थितीत सेवाकार्यासोबतच प्रबोधन महत्त्वाचे असून, त्याचा परिणाम झाला की, लोक सुचनांचे पालन करतील. सेवाकार्याच्या माध्यमातून सक्रीय राहणाऱ्या स्वयंसेवकांनी स्वत:चे आचरण शुद्ध ठेवून इतरांना सहकार्य करावे. केवळ सेवाकार्य हेच संघकार्य, असे गृहीत धरू नका. शासनाच्या सूचनांचे पालन करूनच समाजकार्यात सहभागी व्हा. आपल्या सेवावृत्तीचे कौतुक समाजाकडून होत असून, लॉकडाऊन आहे तोपर्यंत सेवाकार्य चालू ठेवायचे असल्याचे डॉ. मोहन भागवत म्हणाले.
सरसंघचालक म्हणाले, की करोना विषाणुच्या संटकाने प्रथमच जगावर आक्रमण केले आहे. या विषाणुची कोणालाही पूर्ण कल्पना नाही. हे संकट घरात राहूनच जिंकता येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:चे सर्व कार्यक्रम घरात राहूनच करावे. काही समाजकंटकांना घरात बदिस्त करून ठेवल्यासारखे वाटते आहे. म्हणून त्यांच्याकडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशांपासून सावध राहून शांतताने सूचनांचे पालन करावे. यूट्युबवर व फेसबूकवर बौद्धीवर्ग ऐकणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात होती. संचलन नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी केले.
पालघर घडणे अपेक्षित नव्हते:-पालघर घटनेतील साधूंच्या हत्येसंदर्भात शासनाच्या व पोलिसांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भाष्य केले. भारत 130 कोटी लोकसंख्येचा देश असून, सर्वच भारतीय भारतमातेचे पुत्र आहेत, हे प्रत्येकाने स्वत:च्या हृदयात ठेवले पाहीजे. दोन्ही बाजूच्या लोकांनी कोणतेही वैमनस्य न ठेवता जबाबदारीने स्वत:चे रक्षण करावे. असे घडणे अपेक्षित नव्हते, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले.
एका समाजाला दोषी धरणे चुकीचे:- कोरोनाच्या प्रादुभावासाठी एका विशिष्ट समाजाला गृहीत धरल्या जात आहे. मात्र, काहींच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी धरणे चुकीचे ठरणार असल्याचे सरसंघचालक म्हणाले.