ईदची मिरवणूक निघणार नाहीः पोलिसांनी घेतली शांतता समितीची बैठक
नागपूर:- कोविड १९ संदर्भात महाराष्ट्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंदा ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने मिरवणूक काढली जाणार नाही. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील नागरिकांना यंदा घरी ईद साजरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व परिसरांत मिरवणूक काढण्यावर कडक बंदी घालण्यात आली आहे.
या संदर्भात सीपी अमितेशकुमार व एडिशनल सीपी नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशावरून मंगळवारी रंगूनवाला सभागृह, गांजाखेत चौक येथे ईद-ए-मिलादुन्नबी समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि मुस्लिम नागरिकांसह बैठक आयोजित करण्यात आली.
उत्सव साधेपणाने साजरा करा: यावेळी, डीसीपी लोहित मतानी यांनी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व नागरिकांनी ईद साध्या प्रकारे साजरी करण्याचे आवाहन केले. ईदच्या दिवशी कोणत्याही प्रकारची कोणतीही मिरवणूक निघणार नाही आणि एकाच ठिकाणी ५ हून अधिक लोक जमणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. ज्येष्ठ पीआय जयेश भांडारकर म्हणाले की, लॉकडाऊन दरम्यान मुस्लिम नागरिकांनी रमजान ईद, सब्बे बारात, बकरी ईद व इतर सण साजरे केले त्याच प्रकारे ईद-ए-मिलादुन्नबी साजरा करून पोलिसांना सहकार्य करावे. यावेळी समितीचे अधिकारी फैजल रंगूनवाला, मोहम्मद वासी, वरिष्ठ पीआय हिवरे, नगराळे, संखे, कुमरे, पीआय सागर आदी उपस्थित होते.